scorecardresearch

युतीचे ‘व्हेंटिलेटर’वरील संबंध ‘कासव’गतीने सुधारताहेत- उद्धव ठाकरे

या प्रश्नाला उद्धव यांनी फिल्मी स्टाईलमध्ये उत्तर दिले.

युतीचे ‘व्हेंटिलेटर’वरील संबंध ‘कासव’गतीने सुधारताहेत- उद्धव ठाकरे
uddhav thackeray : पत्रकारांनी उद्धव यांना 'व्हेंटिलेटर'वर असलेल्या शिवसेना-भाजप युतीचं काय झालं, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उद्धव यांनी फिल्मी स्टाईलमध्ये उत्तर दिले.

शिवसेना-भाजप युतीचे ‘व्हेंटिलेटर’वर असलेले संबंध सध्या ‘कासव’गतीने पूर्वपदावर येत आहेत, असे सूचक वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते मराठी कलाकार आज उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर आले होते. यावेळी पत्रकारांनी उद्धव यांना ‘व्हेंटिलेटर’वर असलेल्या शिवसेना-भाजप युतीचं काय झालं, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उद्धव यांनी फिल्मी स्टाईलमध्ये उत्तर दिले. युती ‘कासव’गतीने पुढे जातेय, असे ते म्हणाले. उद्धव यांच्या उत्तराने उपस्थितांमध्ये हशा पिकला.

दिल्लीत नुकतीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) घटकपक्षांची बैठक पार पडली होती. महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांदरम्यान शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेल्या वितुष्टामुळे सुरूवातीला उद्धव या बैठकीला उपस्थित राहण्याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत होती. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा हवा असेल, तर ‘मातोश्री’वर चर्चेसाठी यावे, ही ‘रोखठोक’ भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची होती. पण भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ठाकरे यांना दूरध्वनी केला आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) च्या बैठकीस अनुपस्थित राहण्याचा आतापर्यंतचा शिरस्ता मोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी ठाकरे दिल्लीत डेरेदाखल झाले होते. यावेळी उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला भावासारखे असल्याचे म्हटले होते. मी त्यांना नेहमीच नरेंद्रभाई म्हणत आलो आहे.. केंद्र सरकार चांगलेच काम करते आहे, असे सांगत त्यांनी भाजपसोबत कटुता संपल्याचे संकेत दिले होते.

मागील दोन-अडीच वर्षांपासून युतीतील दोन पक्षांमधील संबंध कमालीचे कडवट बनले होते. मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर शिवसेनेने जहरी टीका केली होती. स्वाभाविकपणे मोदी, शहा यांच्या नजरेला नजर भिडवताना ठाकरेंना अवघडल्यासारखे वाटणे स्वाभाविक होते. पण मोदींच्या आगमनापूर्वी शहा आणि ठाकरे यांच्यामध्ये सुमारे पंधरा मिनिटे चाललेली खलबते आणि त्यानंतर मोदींनी ठाकरेंशी साधलेला मनमोकळा संवाद यामुळे वातावरणातील अघोषित तणाव एकदम निवळला होता. किंबहुना वातावरण अधिक हलकेफुलके होते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-04-2017 at 15:12 IST

संबंधित बातम्या