मुंबई महानगरपालिकेत युती होणार की नाही याबाबत अजूनही संभ्रम सुरू आहे. त्यातच आता शिवसेनेने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. सामना या आपल्या मुखपत्रातून त्यांनी दानवे यांना फटकारले आहे. वयाच्या साठीत दानवेंना सकारात्मक विचार सुचत असल्यामुळे युतीबाबत ते श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला देत आहेत. दानवेंसारखे लोक राजकारणात असल्यामुळे बऱ्याच चांगल्या गोष्टी चालल्या असून त्यांच्या सकारात्मक व आश्वासन भूमिकेमुळे युतीवाद्यांना नक्कीचा तजेला येईल. निवडणुकीच्या आदल्या दिवशी दारात आलेली लक्ष्मी परत पाठवू नका, लक्ष्मीदर्शन घ्या असा सल्ला देणारे हे सकारात्मक सज्जन प्रवृत्तीचेच लक्षण असल्याचा उपरोधिक टोलाही लगावला. दानवे यांनी नुकतेच माध्यमांसमोर बोलताना शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्याला शिवसेनेने दिलेले हे उत्तर मानले जाते.

दानवे यांची सकारात्मक आणि आश्वासक भूमिका पाहून ‘युती’वाद्यांना नक्कीच तजेला येईल. कठीण प्रसंगातून मार्ग काढून सगळ्यांची वाकडी तोंडे वळवून ते युतीत हास्य निर्माण करतील असा आशावाद व्यक्त केला. मुंबईसह राज्यात शिवसेनेसोबत युती करण्यासाठी आम्ही सकारात्मक असून शेवटपर्यंत आमचे प्रयत्न सुरू असल्याचे दानवे म्हणाले होते. दानवेंसारखे लोक राजकारणात आहेत म्हणून बऱ्याच गोष्टी चांगल्या चालल्या आहेत अशा शब्दांत टोला लगावला.
काय म्हटलंय शिवसेनेने..
– २६ जानेवारी रोजी देशाला स्वत:ची घटना, कायदे मिळाले. नवे अस्तित्व मिळाले. त्यामुळे प्रजासत्ताक दिनीच शिवसेना युतीबाबत निर्णय जाहीर करणार.
– सत्तेचा माज आम्हाला कधीच नव्हता. जनताच सत्ता देते व तीच जनता माज उतरवते. जनतेसमोर आम्ही नतमस्तक.
– रावसाहेब दानवेंच्या सकारात्मक भूमिकांनी सध्या महाराष्ट्राच्या समाजमनात खळबळ उडाली आहे. त्यांनी लक्ष्मीदर्शन व नोटाबंदीवर रामबाण उपाय सांगितला आहे.
– युतीबाबत दानवे आश्वासक, सकारात्मक असल्यामुळे शिवसेनेचीही चिंता मिटली आहे.