शिवसेना-भाजपचे नगरसेवक आमनेसामने

नरेंद्र मोदी यांनी मुंबईत ‘महागर्जना’ केल्यामुळे पक्षाच्या नगरसेवकांना बळ मिळाल्याचा प्रत्यय शुक्रवारी पालिकेत आला.

नरेंद्र मोदी यांनी मुंबईत ‘महागर्जना’ केल्यामुळे पक्षाच्या नगरसेवकांना बळ मिळाल्याचा प्रत्यय शुक्रवारी पालिकेत आला. भाजप नगरसेवकांनी थेट शिवसेनेलाच आव्हान दिले. अखेर उभय पक्षांचे नगरसेवक हमरातुमरीवर उतरले. गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाला अखेर तोंड फुटले. निमित्त झाले ते चर खणण्याच्या प्रस्तावाचे.
स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर शिवसेना आणि भाजप नगरसेवक आमनेसामने आले. विरोधकांबरोबर भाजपने केलेला सभात्याग न रुचल्यामुळे सेना नगरसेवक संतप्त झाले होते. तर शिवसेनेचे पदाधिकारी आपली कायम अवहेलना करीत असल्याची सल मनात बोचत असलेले भाजप गटनेते दिलीप पटेल आणि स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्यात चर बुजविण्याच्या प्रस्तावावरून शाब्दिक चकमक उडाली.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेचे नगरसेवक भाजप नगरसेवकांना चिथावणी देत युतीमधील चकमकीचा आनंद घेत होते. दिलीप पटेल यांनी शिवसेनेवर तोफ डागली. दफ्तरी दाखल करायचा प्रस्ताव राखून ठेवत प्रशासनाला मदत करता, असा आरोप भाजप नगरसेवकांनी केला. मुंबई भाजप अध्यक्षांनी खड्डे बुजविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले, जनता आम्हाला जाब विचारते, तुम्ही काय करता, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावताच शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव, किशोरी पेडणेकर पुढे सरसावल्या. त्यांनी पटेल यांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. पूर्ण माहिती न घेताच बडबडता, अपयशाची जबाबदारी आम्हीही घेतो, असे प्रत्युत्तर शिवसेना नगरसेविकांनी दिले.
या शाब्दिक चकमकीचा आनंद काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि सपाचे नगरसेवक घेत होते. अतिरिक्त आयुक्तांना घेराव घालण्याच्या इराद्याने भाजप आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक स्थायी समितीत आले होते. पण शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादाचा फायदा घेत अतिरिक्त आयुक्तांनी हळूच तेथून काढता पाय घेतला. शिवसेना नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे पटेल आणि भाजपच्या इतर नगरसेवकांनी नमते घेतले आणि स्थायी समिती सभागृह शांत झाले. आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये उडालेली ही चकमक बरेच काही सांगून गेली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shiv sena bjp councilors standing face to face

ताज्या बातम्या