परस्परांना दूषणे देत, टीका करीत निवडणूक लढवलेल्या शिवसेना-भाजपने आता कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्तास्थापनेसाठी युतीची तयारी दर्शवली आहे. मात्र, सत्तेसाठी दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चिन्हे असली तरी महापौरपदावरून उभय पक्षांमध्ये एकवाक्यता नसल्याचे चित्र आहे. महापौरपद मिळणार नसेल तर युती करण्यात रस नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे युती करण्यात येईल, असे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येत असले तरी कोणत्या प्रस्तावावर युती होणार हे अजून गुलदस्त्यातच आहे.
शिवसेना आणि भाजप या दोघांनाही अपक्ष आणि मनसेची मदत घेऊन सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. पण राज्य आणि केंद्रात सत्तेत असल्याने महापालिकेतही युती करावी, असे दोन्ही पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यात शुक्रवारी सायंकाळी चर्चा झाली. त्यात युती करण्याचे ठरले असल्याचे दोन्ही पक्षांतील सूत्रांकडून सांगण्यात आले. पण महापौरपद प्रथम कोणाकडे, कोणाचा महापौर किती काळ ठेवायचा, उपमहापौरपद, स्थायी समिती अध्यक्षपद यांसह अन्य समित्या आदींबाबत सविस्तर चर्चा करून प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी भाजपने सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेने एकनाथ िशदे या नेत्यांवर सोपविली आहे.
भाजपला शेवटचे एक वर्ष महापौरपद आणि शिवसेनेला शेवटची दोन वर्षे स्थायी समिती अध्यक्षपद असा प्रस्ताव शिवसेनेने दिल्याचे संबंधितांनी सांगितले. एकंदरीतच दोन्ही पक्षांकडून ताठर भूमिका घेण्यात येत असून माघार कोणी घ्यायची, हा प्रश्न आहे. पण युती होईल, अशी अपेक्षा दोन्ही पक्षांकडून व्यक्त होत आहे.

* भाजपला शेवटचे एक वर्ष महापौरपद आणि शिवसेनेला शेवटची दोन वर्षे स्थायी समिती अध्यक्षपद, असा प्रस्ताव
* सविस्तर प्रस्तावाची जबाबदारी मुनगंटीवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर