scorecardresearch

जातीऐवजी आर्थिक निकषावर आरक्षण द्या – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधतानाच त्यांनी नरेंद्र मोदी यांचे सर्जिकल स्ट्राईकचे कौतुक केले आहे.

जातीऐवजी आर्थिक निकषावर आरक्षण द्या – उद्धव ठाकरे
Uddhav thackeray : आगामी महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची राज्यव्यापी बैठक बुधवारी मुंबईतील रंगशारदा सभागृहात होते आहे.

आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने वडील बाळासाहेब आणि आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांना शाळा सोडावी लागली होती. आम्हाला आर्थिक परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळे जातीऐवजी आर्थिक निकषणावरच आरक्षण द्यावे असे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे. शिवसेना न्यायहक्कांसाठी लढणा-यांसोबत असल्याचे सांगत ठाकरेंनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

यंदा शिवसेनेच्या दस-या मेळाव्याला पन्नास वर्ष झाली असून शिवाजी पार्कवर झालेल्या मंगळवारी झालेल्या मेळाव्यात शिवसैनिकांची अलोट गर्दी झाली होती. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. शिवाजी पार्कवरील गर्दी बघून माझ्या डोळ्यासमोर गेल्या ५० वर्षाच्या दसरा मेळाव्याच्या आठवणी ताज्या झाल्या असे भावनिक विधान करत उद्धव ठाकरेंनी भाषणाला सुरूवात केली.  शिवसैनिक हेच माझ्यासाठी खरं सोनं आहेत असे त्यांनी सांगितले.  विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही गाफील राहिलो. मित्राने आमच्या पाठीवर वार केले. पण आता हिंमत असेल तर युती तोडावी आणि समोर येऊन आमच्या अंगावर यावे. मग आम्हीदेखील दाखवू सर्जिकल स्ट्राईक कसा करतात ते असे ठणकावत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपमध्ये कोणीही उठतं आणि स्वबळाची भाषा करतात. पण मुंबई ही शिवसेनेचीच असून महापालिकेत मुंबईचाच विजय होणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.  सर्जिकल स्ट्राईक केल्याबद्दल नरेंद्र मोदी आणि जवानांचे अभिनंदन करतो. आम्हाला असेच पंतप्रधान हवे होते असे ठाकरेंनी सांगितले.

सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करणा-यांचाही ठाकरेंनी समाचार घेतला. मोदींवर टीका करताना भारतीय लष्करावर प्रश्न उपस्थित करु नये. लष्करावर प्रश्न उपस्थित करणारे सडक्या मेंदूचे करंटे हे भारतात नव्हे तर पाकिस्तानमध्ये जन्मलेले आहेत अशी घणाघाती टीका त्यांनी केली. मोदींनी आता जगाच्या नकाशावर पाकिस्तानही हिंदूस्तान म्हणून ओळखला जाईल अशी कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

राज्यातील घटना बघून हा राज्य घडतोय की बिघडतोय असा सवाल उपस्थित करत उध्दव ठाकरेंनी राज्यसरकारला टोला लगावला. आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जयललितांप्रमाणे खमकी भूमिका घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली.  एखाद्या धर्माचा किंवा जातीचा आहे म्हणून आरक्षण देण्याऐवजी गरीब म्हणून आरक्षण द्यावे असे ते म्हणालेत. अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा हवी असेल तर ती झालीचे पाहिजे अशी ठाम भूमिकाही त्यांनी मांडली आहे.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

> ‘रक्ताची दलाली’ हा शब्दप्रयोग बोफोर्समधून शिकलात का? – उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना सवाल
> आम्ही स्वीकारलेला मानवतावाद कुणीतरी पाकिस्तानला जाऊन शिकवावा – उद्धव ठाकरे<br />> अच्छे दिन हे आमच्या गळ्यातील लोढणं हे कसं म्हणता? – उद्धव ठाकरेंचा नितीन गडकरींना सवाल
> चांगल्या कामात मी राज्य आणि केंद्र सरकारच्या खांद्याशी खांदा लावून काम करणार – उद्धव ठाकरे
> मुंबई शिवसेनेचीच, मुंबईवर संकट आल्यावर भगवाच कामी आला – उद्धव ठाकरे
> दिवाळीनंतर मी शिवसेनेच्या प्रत्येक शाखेत जाणार – उद्धव ठाकरे
> दसरा मेळावा होऊ नये असे अनेकांना वाटते, पण त्यांना माहित नाही शिवसैनिक काय आहे – उद्धव ठाकरे
> शिवसेना हा महाराष्ट्रातील सर्वात जुना पक्ष, एक नेता, एक विचार असलेला राज्यात दुसरा पक्ष नाही – उद्धव ठाकरे
> काँग्रेस नेस्तनाबूत झाली, पण शिवसेना कायम आहे आणि यापुढेही राहणार – उद्धव ठाकरे

 

 

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-10-2016 at 20:03 IST

संबंधित बातम्या