केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये सहभागी असतानाही सरकारच्या नोटाबंदीच्या धोरणाच्या विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोच्र्यात सहभागी होऊन शिवसेनेने मित्र पक्षाचा एक प्रकारे निषेध केला. पण अशी भूमिका घेण्याची शिवसेनेची ही काही पहिलीच वेळ नाही. याउलट अशा राजकीय कोलांटउडय़ा मारण्याचा शिवसेनेचा इतिसाहसच आहे.

हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निषेधार्थ नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनावर ममता बँनर्जी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोच्र्यात शिवसेना खासदार सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाला शिवसेनेने सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निर्णयावर टीकाही केली होती. ‘महाराष्ट्रात भाजप नेते राष्ट्रवादीवर टीका करतात, पण त्याच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून मोदी बसतात, तसेच मोदी आणि पवार हे परस्परांचे कौतुक करतात. हे चालते, मग आम्ही ममतादिदींबरोबर सामान्य लोकांच्या प्रश्नाच्या संदर्भात एकत्र आल्यास वेगळा अर्थ का काढला जातो, असा शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सवाल आहे.

शिवसेनेची भूमिका कधीच ठोस राहिलेली नाही. मग ‘ईस देश मे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा’ या नाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून ‘ इस देश मे रहते रहेंगे, लेकीन.’ असे प्रत्युत्तर देणाऱ्या मुस्लीम लिगची शिवसेनेने कधी काळी मुंबई महानगरपालिकेत महापौर निवडणुकी मदत घेतली होती. काँग्रेस आणि इंदिरा गांधीबाबत शिवसेनेच्या भूमिकेत कधीच सातत्य नव्हते. आणिबाणीला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला होता. आणिबाणी किंवा नंतरही बाळासाहेबांनी काँग्रेसचे गुणगान गायले, त्याच काँग्रेसवर यथेच्छ टीकाही ठाकरे यांनी केली. शिवसेनेच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात त्याचा उल्लेख ‘वसंतसेना’ असा केला जायचा. कारण तेव्हा वसंतराव नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री होते व त्यांच्या कलाने शिवसेना नेते निर्णय घ्यायचे, अशी टीका व्हायची.

शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी शरद पवार आणि दत्ता सामंतांसोबत गिरणी कामगारांचे प्रश्न किंवा अन्य विविध मुद्दय़ांवर हातमिळवणी केली होती. पण गिरणी कामगारांच्या संपानंतर शिवसेनेने दत्ता सामंत यांच्यावर यथेच्छ टीका केली. भाजपबरोबर युती असताना कमळाबाई म्हणून भाजपची हेटाळणी ठाकरे करीत असत.

भाजपबरोबर युती असतानाही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत टी. एन. शेषन यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. पुढे प्रतिभाताई पाटील यांना मराठी म्हणून तर गेल्या वेळी प्रणब मुखर्जी या काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा दर्शविला. नारायण राणे यांच्या हकालपट्टीनंतर शिवसेनेने तेव्हा गृह खाते ताब्यात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेतले होते. पाकिस्तानी संघाला मुंबईत बंदी अशी घोषणा एकीकडे करणाऱ्या ठाकरे यांनीच पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदाद यांना ‘मातोश्री’ वर निमंत्रित केले होते. काही कलाकारांच्या चित्रपटावर आधी बंदी घालायची नंतर ही बंदी मागे घेण्याचे प्रकारही घडले आहेत. यामुळेच शिवसेना आधी भूमिका घेईल त्यावर ठाम राहिल असे कधी झालेले नाही.