पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाक दौऱयावर शिवसेनेने ‘सामना’तून जोरदार टीका केली आहे. भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारावेत अशी आमचीही इच्छा आहे. मात्र, पाकची भूमी शापित आहे. त्या शापित भूमीशी चुंबाचुंबी करणे महागात पडते. त्यामुळे जसा वाजपेयींसोबत धोका झाला होता तसा मोदींसोबतही होऊ नये हीच आमची इच्छा असल्याचे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.
हिंदुस्थानातील जे जे राजकारणी पाकच्या भूमीवर गेले. त्यांचे राजकारण पुढे फार चालले नाही अशी एक अंधश्रद्धा आहे. लालकृष्ण आडवाणी हे ‘जीनां’च्या कबरीवर जाऊन त्यांचे गुणगान करून आले व त्यांच्या राजकारणास उतरती कळा लागली आणि आज ते अडगळीत फेकले गेले. वाजपेयी यांनी ‘लाहोर बस’ सोडण्यापासून पुढे आग्रा येथे जनरल मुशर्रफ भेटीपर्यंत श्रम घेऊन पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी मनापासून प्रयत्न केले, पण त्यानंतर वाजपेयींच्याच नेतृत्वाखालील भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकले नाही. त्यामुळे मोदींचेही भविष्यात तसेच होणार नाही ना? याचे भान ठेवालया हवे, असा सल्ला लेखात देण्यात आला आहे. शिवाय, हाफीज सईद, इम्रान खान काय बरळले त्यापेक्षा मोदींच्या पाकभेटीचे कौतुक लालकृष्ण अडवाणी यांनीही केले हे विशेष असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे. काँग्रेसचे पंतप्रधान अचानक लाहोर किंवा कराचीत उतरले असते, तर भाजपने त्यांचे जंगी स्वागत केले असते का? असा खोचक सवाल देखील शिवसेनेने यावेळी उपस्थित केला.