अखंड महाराष्ट्राच्या मुद्दय़ावरून गेले दोन दिवस विरोधी पक्षाबरोबर शिवसेनेने सभागृहात आक्रमक भूमिका धारण केली होती. एवढेच नव्हे तर विधानसभेत विदर्भवादी घोषणा देणाऱ्या भाजप आमदारांच्या निलंबनाची मागणीही लावून धरली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात मांडलेली भूमिका व ‘मातोश्री’शी झालेल्या चर्चेनंतर आक्रमक शिवसेना ‘थंड’ पडली. शिवसेनेच्या या टोपी बदलू भूमिकेवरून काँग्रस-राष्ट्रवादीने सभागृहात ‘वाघाचे काय झाले, शेळी झाली.. शेळी झाली’, सिंहाने काय खाल्ले.. वाघ खाल्ला.. वाघ खाल्ला’ अशा घोषणा देत विधानसभा दणाणून सोडली.
विधानसभेचे कामकाज सकाळी सुरू झाल्यापासून शिवसेना आक्रमक होती. सेनेचे आमदार ‘अखंड महाराष्ट्र’ असे लिहिलेल्या टोप्या घालून तसेच फलक फडकावत घोषणा देत होते. शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी आपल्या भाषणात थेट मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवताना मुख्यमंत्र्यांनी अखंड महाराष्ट्राबाबत भूमिका स्पष्ट केली नाही, असा थेट आरोप करत स्पष्टीकरणाची मागणी केली.




वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे महाराष्ट्रद्रोही असल्याचे सांगत विदर्भाच्या घोषणा देणाऱ्या आमदारांना निलंबित करण्याची जोरदार मागणी केली. सभागृहासमोर स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव नाही, असे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशीही संपर्क साधला. त्यापाठोपाठ शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम आदींना ‘मातोश्री’वर बोलाविण्यात आले. यानंतर सभागृहातील शिवसेनेचा आवाज बसला. शिवसेनेने अखंड महाराष्ट्राची टोपी घातली आणि तासाभरात फिरवली असा आरोप करत शिवसेनेने अखंड महाराष्ट्राशी प्रतारणा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. तसेच विरोधकांनी शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
खासदार पटोले यांचे शिवसेनेला प्रतिआव्हान
- वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून शिवसेना आणि इतरांनी भाजपला धमकी देण्याचे कारण नाही. महाराष्ट्र सरकारचा पाठिंबा काढण्यापासून शिवसेनेला कोणीही रोखलेले नाही, असे प्रतिआव्हान खासदार नाना पटोले यांनी दिले आहे.
- शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत युतीमध्ये वातावरण गढूळ करीत आहेत.सरकार पडण्याची धमकी राऊत यांनी देऊ नये. ते काही शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते नाहीत, असे पटोले म्हणाले.
- वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी लोकसभेत खासगी प्रस्ताव मांडण्याचा प्रस्ताव दिल्यापासून पटोले सध्या वादळाच्या केंद्रस्थानी आहे. लोकसभेच्या कामकाजात नियोजितअसूनही पटोलेंचा खासगी प्रस्ताव वेळेअभावी मागील शुक्रवारी सादर झाला नव्हता. आता तो १२ ऑगस्टला लोकसभेमध्ये येण्याची शक्यता आहे. मात्र, तो अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने कामकाजाबाबत खात्री नाही.
- पटोले यांच्या या टीकेवर या क्षणी प्रतिक्रिया देणार नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.