“शिवसेनेचे हिंदुत्व ढोंगी”; ‘ईद ए मिलाद’साठी परवानगी दिल्यानंतर भाजपाचा हल्लाबोल

सरकारकडून ‘ईद ए मिलाद’साठी मुंबई व उपनगरांत मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आली आहे

cm uddhav thackeray
प्रविण दरेकर आणि भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवनेवर टीका केली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नियमाच्या अनुषंगाने ‘ईद ए मिलाद’साठी मुंबई व उपनगरांत एकेक मिरवणूक काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. या दोन्ही मिरवणुकीमध्ये प्रत्येकी पाच ट्रक व प्रत्येक ट्रकमध्ये पाच नागरकिांना परवानगी देण्यात आली आहे. यावेळी मिरवणुकीत उपस्थित नागरिकांना करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे. मुंबईत ‘ईद’च्या पार्श्वभूमीवर इतर मिरवणुकीस बंदी घालण्यात आल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान,विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवनेवर टीका केली आहे.

“कॉंग्रेसला खुश करण्याच्या नादात मुख्यमंत्र्यांकडून अल्पसंख्याकांचं पुन्हा एकदा लांगूनचालन करण्यात आले आहे. यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंदुत्व किती ढोंगी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले”, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

अतुल भातखळकर म्हणाले, “करोनाचे कारण पुढे करत हिंदू संणांवर बंदी घालणाऱ्या सेनेने ईद मिरवणुकीला मात्र परवानगी दिली. जनादेशाचा अनादर करून कॉंग्रेस सोबत सत्तेत बसायचे, शिवाजी पार्क उजळविण्याच्या नावाखाली इटालियन दिवे वापरून गांधी परिवाराला खुश ठेवायचे यातून जनाब सेनेची वाटचाल कॉंग्रेसच्या प्रकाशाखाली होत असल्याचे स्पष्ट दिसते.”

हेही वाचा – ‘ईद ए मिलाद’निमित्त दोनच मिरवणुकांना परवानगी

“उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून मुंबईत करोनाची तिसरी लाट येणार नसल्याचे मान्य करणाऱ्या मुंबई महापालिकेने मात्र करोनाची भीती दाखवत करोडो हिंदुच्या श्रद्धेचा विषय असलेल्या दहीहंडी, गणेश उत्सव, गरबा साजरा करण्यास व देवीच्या मिरवणुका काढण्यास बंदी घातली. करोनाचे नियम पाळत या सणांना परवानगी द्या, अशी मागणी मी स्वतः व भाजपाने वारंवार करून सुद्धा शिवसेनेने या सणांवर बंदी तर घातलीच परंतु करोनाचे सर्व नियम पाळत सार्वजनिक पद्धतीने उत्सव साजरे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुद्धा त्यांनी केले. परंतु याउलट अगोदर मोहरम आणि ईद मिरवणुक काढण्याला मात्र बिनदिक्कत परवानगी देण्यात आली.”,असे भातखळकर म्हणाले.

दरेकरांनी देखील साधला निशाणा

हिंदुत्व हे काही सोयीच हत्यार नाही, पाहिजे तेव्हा काढायचं पाहिजे तेव्हा म्यान करायचं. हिंदुत्व ही चळवळ आहे. पण हिंदुत्वाची भूमिका मांडताना शिवसेनेची सध्या कसरत होत आहे. कारण एकाबाजुला संमिश्र विचारधारा असणारी कॉँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या साथीने शिवसेनेला सरकार टिकवायचं आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्या हिंदुत्वाच्या भूमिकवरुन शिवसेनेला आपले अस्तित्व सुद्धा टिकवायचं आहे. पण दुदैर्वाने शिवसेनेचा हिंदुत्वाचा पाया ढासळत चालला असून त्याला पुन्हा एकदा भक्कम करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हिंदुत्वारुन शिवसेनेची भूमिका सध्या द्विधा मनस्थितीत सापडल्याचे चित्र दिसत असल्याची टीका प्रविण दरेकर यांनी आज केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shiv sena hindutva hypocrisy bjp criticism after allowing eid e milad srk

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या