खडसेप्रकरणी सेनेच्या भूमिकेने भाजपमध्ये संताप!

मंत्रिमंडळ विस्तारात भाजप उट्टे काढण्याची शक्यता

युतीतील दरी रुंदावली; संघर्ष शिगेला पोहोचण्याची चिन्हे; मंत्रिमंडळ विस्तारात भाजप उट्टे काढण्याची शक्यता
भोसरीतील जमीन प्रकरणातून एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेत साजरा झालेला जल्लोष भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. एकूणच शिवसेनेतून खडसे प्रकरणी व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांबद्दल भाजपमध्ये संताप व्यक्त होत असून, सत्तेत सहभागी असलेली शिवसेना भाजपविरुद्ध आगीत तेल ओतत असल्याची भावना भाजपमध्ये व्यक्त होत आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची युती होऊ नये, यासाठी आग्रही असलेल्या नेत्यांमध्ये एकनाथ खडसे आघाडीवर होते. युतीच्या राजकारणावर फुली मारली जावी आणि शिवसेनेला महाराष्ट्रातील त्यांच्या ताकदीची जाणीव करून द्यावी, यासाठी खडसे यांनी पुढाकार घेतला होता. जागावाटपाच्या चर्चेतही शिवसेनेशी कोणतीच तडजोड होऊ नये यासाठी खडसे आग्रही होते आणि युती तुटल्याची घोषणा करण्याचे कामही त्यांनी खुशीने अंगावर घेतले होते. फडणवीस सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाल्यानंतरही, खडसे यांचा सेनाविरोध कायम होता. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप-सेना युती होणार नाही, असेही खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या काही दिवस अगोदर जाहीर करून टाकले होते. खडसे आणि शिवसेना यांच्यातील वादात उद्योग खात्याच्या अखत्यारीतील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या भोसरी येथील जमिनीच्या प्रकरणाची फोडणी पडल्यानंतर शिवसेनेने त्याचा वचपा काढून खडसे यांच्यावर नेम साधला. ती जमीन एमआयडीसीचीच असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर केल्याने फडणवीस सरकारची कोंडी झाली व खडसे एकाकी पडले. शिवसेनेकडून एका बाजूने खडसे यांचा कोंडमारा करण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळेच भाजपने पक्ष पातळीवर खडसे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेत शिवसेनेला खडसावले. त्यातूनच, खडसे प्रकरणी भाजपच्या अंतर्गत बाबीत लुडबूड करू नका असा इशारा देणारे पत्रकच पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी जारी केले.
खडसे यांच्या जावयाच्या मालकीच्या लिमोझिन गाडीवरून पहिला वाद उफाळला. या वादाला तोंड फुटताच सारा तपशीलही बाहेर आल्यामुळे शिवसेनेकडे असलेल्या परिवहन खात्यानेच ही ‘तत्परता’ दाखवून बदनामीच्या मोहिमांना हातभार लावल्याची भावना भाजपमध्ये बळावली. खडसे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेची प्रतिमा मलीन होत असल्याने खडसेंवर कारवाई झाली पाहिजे असा आग्रह शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धरल्याने, शिवसेना पक्षाच्या बदनामीसाठी विरोधकांहून आक्रमक झाल्याचे संकेत मिळू लागले व भाजपमध्ये खदखद सुरू झाली होती.
खडसे यांच्या राजीनाम्यानंतर जळगावात शिवसैनिकांनी फटाके वाजवून जल्लोष केल्याने या संतापात भर पडली असून सेना-भाजपमधील दरी रुंदावल्याचे संकेत मिळू लागले आहेत. शिवसेनेच्या या मित्रद्रोहाबद्दल मंत्रिमंडळाच्या संकल्पित विस्तारात फडणवीस यांच्याकडून सेनेला योग्य ती ‘बक्षिसी’ दिली जाईल, असे भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

खडसे समर्थक १३ नगरसेवकांचे राजीनामे
जळगाव: एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर जळगाव महापालिकेतील १३ भाजप नगरसेवकांनी रविवारी राजीनामा दिला. जळगाव महापालिकेत भाजपचे १५ नगरसेवक असून दोघांनी राजीनामा न दिल्याने पक्षातील गटबाजी समोर आली आहे. पक्षाचे महानगर प्रमुख आमदार सुरेश भोळे यांच्याकडे आपले राजीनामे सोपविले. दरम्यान, खडसे यांच्या राजीनाम्याचा जिल्हा लेवा पाटीलदार मंडळाकडून निषेध करण्यात आला आहे.

खडसेंनी जिल्हा दावणीला बांधला – आ. पाटील
जळगाव: एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करून टाकला. खडसेंनी जिल्हा दावणीला बांधला, असा आरोप शिवसेना नेते आमदार गुलाबराव पाटील यांनी केला.धरणगावमधील पाळधी या आपल्या गावी वाढदिवसानिमित्त रविवारी रात्री आयोजित जाहीर सभेत पाटील यांच्या टीकेचे लक्ष्य खडसे हेच ठरले. लाल दिवा आपल्याकडे नसला तरी लाल दिवा घालवू शकतो. खडसेंची सून रक्षा यांच्या खासदारकीसाठी आपण रात्रीचा दिवस करून पायपीट केली ते खडसे विसरले. खडसेंनी माझ्याविरुद्ध माझ्याच गावात षड्यंत्र रचले

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shiv sena hits out at bjp for standing by eknath khadse

ताज्या बातम्या