५० पेक्षा अधिक जागा लढविण्याचा निर्णय

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे राज्यातील दोन मुख्य पक्ष शेजारील गुजरातमध्ये आपले नशिब आजमिवणार आहेत. भाजपवर कुरघोडी करण्याकरिताच शिवसेनेने ‘जय गुजरात’चा नारा देत ५० पेक्षा अधिक जागा लढविण्याचा निर्णय जाहीर केला.

गुजरातमध्ये शिवसेनेची ताकद नगण्य असली तरी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना उतरणार आहे. पक्षाने इच्छुकांच्या मुलाखती अहमदाबादमध्ये सुरू केल्या आहेत. पक्षाचे खासदार अनिल देसाई व हेमराज शहा हे निवडणुकीचे सारे नियोजन करीत आहेत. शिवसेना पहिल्या टप्प्यात मतदान असलेल्या मतदारसंघांमध्ये ५०च्या आसपास जागा लढणार असल्याचे खासदार अनिल देसाई यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांतील उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. गुजरातमध्ये शिवसेनेची चांगली ताकद असून, भाजप आणि काँग्रेसला पर्याय म्हणून शिवसेना महत्त्वाची भूमिका बजावेल, असा दावाही खासदार देसाई यांनी केला.

या वर्षांच्या सुरुवातीला झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेने काही जागांवर उमेदवार उभे केले होते. पण पक्षाच्या उमेदवारांची अनामतही वाचली नव्हती. भाजप आणि शिवसेनेत सध्या कमालीची कटुता निर्माण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपला अपशकून करण्याच्या उद्देशानेच मतविभाजन करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये केशुभाई पटेल यांच्यासारख्या मातब्बर नेत्याने बंडखोरी करूनही फारसा परिणाम झाला नव्हता. त्या तुलनेत शिवसेना फारच नगण्य आहे. यामुळे भाजपचे नेते शिवसेनेच्या या खेळीकडे दुर्लक्ष करीत आहेत.

राष्ट्रवादी कोणाबरोबर ?

राज्यसभा निवडणुकीत दोन आमदार असलेल्या राष्ट्रवादीने भाजपला मदत केली होती. अहमद पटेल यांच्यासारख्या राष्ट्रवादीशी मैत्रीचे संबंध ठेवणाऱ्या नेत्याला मदत करण्यात आली नव्हती. गुजरातमध्ये काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची तयारी असून, चर्चा सुरू असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी अलीकडेच जाहीर केले. काँग्रेस पक्ष मात्र राष्ट्रवादीला बरोबर घेण्यास फार काही उत्सूक नाही.

शिवसेनेने बहुदा घुमजाव केलेले दिसते. यापूर्वी निवडणूक लढणार नाही व हार्दिक पटेलला पाठिंबा जाहीर केला. पण आता शिवसेना आमच्या विरोधात गुजरातमध्ये लढणे यात नवीन काही नाही. यापूर्वी गोवा, उत्तर प्रदेश या ठीकाणीही ते लढले होते.   – माधव भांडारी, प्रवक्ते भाजप