आमदारांमधील अस्वस्थता वाढत चालल्याने शिवसेनेला राज्यातील सत्तेत जाण्याचे वेध लागले असून, सरकारविरोधी सुरांच्या आडून ‘मीलना’चे संकेतही सेनेच्या नेत्यांकडून मिळत आहेत. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी बाकांवर बसण्याचा निर्धार व्यक्त करतानाच ‘आम्ही अजूनही एनडीएतच आहोत’ हेही शिवसेनेच्या नेत्यांकडून रविवारी ठासून सांगितले जात होते.
‘राष्ट्रवादीचा पाठिंबा घेताना अस्वस्थ होतो’ किंवा ‘शिवसेना आमचा नैसर्गिक आणि जुना मित्र आहे’ अशी विधाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नवी दिल्लीत केल्यानंतर दोन्ही पक्षांतील युतीचे गुऱ्हाळ पुन्हा सुरू झाले आहे. भाजप आपल्याला बरोबर घेण्यास तयार असल्याचे चित्र निर्माण झाल्यावर शिवसेनेच्या अपेक्षा वाढल्या. मंत्रिमंडळात शिवसेनेला महत्त्वाची खाती तसेच योग्य संख्याबळ मिळाले पाहिजे, असे खासदार गजानन कीर्तिकर यांनी सांगत शिवसेना कमीपणा घेणार नाही, असे चित्र रंगविण्याचा प्रयत्न केला, तर ‘हिवाळी अधिवेशनात शिवसेना विरोधी बाकांवरच बसेल,’ असे खासदार संजय राऊत म्हणाले. प्रवक्तेपदावरून हकालपट्टी झालेल्या राऊत यांनी केलेल्या या वक्तव्याने पक्षातील संभ्रम वाढला आहे. मात्र, ‘केंद्रात नरेंद्र मोदी सरकारच्या भूमिकेला आमचा पाठिंबा असेल. महाराष्ट्रातील घडामोडींचा त्यावर परिणाम होणार नाही,’ अशी दोन दगडांवर पाय ठेवणारी भूमिकाही राऊत यांनी रविवारी मांडली.
दुसरीकडे, भाजपने शिवसेनेला त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न केला. ‘शिवसेनेचे स्वागतच आहे, पण कोणत्याही अटी वा शर्तीशिवाय मंत्रिमंडळात प्रवेश होऊ शकतो,’ असे विधान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
चर्चेचे गुऱ्हाळ
*शिवसेनेचा डोळा गृहसह अन्य काही महत्त्वाच्या खात्यांवर आहे.
*कोणत्याही परिस्थितीत गृह खाते दिले जाणार नाही हे भाजपने आधीच स्पष्ट केले आहे.
*चांगली खाती मिळाली पाहिजेत, अशी वातावरणनिर्मिती करीत महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.
*भाजपने मात्र शिवसेनेच्या कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, असे स्पष्ट
केले आहे.

मंत्रिमंडळात शिवसेनेचा सहभाग स्वागतार्ह आहे, पण कोणत्याही अटी व शर्थींशिवाय समावेश होऊ शकतो. मित्र पक्षाचा योग्य सन्मान ठेवला जाईल, पण कोणत्याही अटी नसाव्यात.
– विनोद तावडे, मनुष्यबळ विकासमंत्री

शिवसेनेला मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती व योग्य संख्याबळ मिळाले पाहिजे. पाठिंब्यासाठी भाजपला शिवसेनेची गरज आहे. अशा वेळी महत्त्वाच्या खात्यांची अपेक्षा करण्यात चूक काया.
– गजानन कीर्तीकर, शिवसेना खासदार