हनुमान चालीसा प्रकरणी अटकेनंतर पोलिसांवर अमानुष वागणूक दिल्याचा आरोप करणाऱ्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी सोमवारी संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर आपली बाजू मांडली. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी २३ एप्रिल रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीत अमानुष वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली. ही बाब गांभीर्याने घेत लोकसभा सचिवालयाने गृह मंत्रालयामार्फत महाराष्ट्र सरकारकडे माहिती मागवली होती.

त्यानंतर नवनीत राणांनी संसदीय अधिकार समितीसमोर आपली बाजू मांडली आहे. मुंबई पोलिसांविरोधातील तक्रारीनंतर नवनीत राणा यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यानंतर आता मुंबई पोलिसांना आपली बाजू मांडण्यासाठी बोलवण्यात येणार आहे. यावरुन आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.

“मुंबई पोलिसांना हाकलून लावण्याची भाषा केलीस तू तुझ्या घरी. त्याच पोलिसांनी चौकीत खाऊ घातली चाय बटर खारी. मुंबई पोलिसांचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केलास जरी. आम्ही तक्रार करून उभ करू तुला गृहमंत्र्यांच्या दारी. अमरावतीची बाकरवडी,” असे दीपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

“लोकसभा अध्यक्ष हे खासदारांचे पालक असतात. आमच्या प्रकरणात न्याय मिळावा आणि आरोपींवर कारवाई करावी, असे आवाहन मी त्यांना केले आहे. माझ्या अटकेची संपूर्ण घटना मी त्याला सांगितली. लोकसभेच्या विशेषाधिकार समिती २३ मे रोजी माझ्या तक्रारींवर विचार करेल आणि मी समितीला लेखी निवेदनही देईन,” असे नवनीत राणा म्हणाल्या होत्या.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा दिल्याने राणा दाम्पत्याला २३ एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांवर राजद्रोहासह अनेक कलमे लावली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याला विशेष न्यायाधीश आर.एन.रोकडे यांनी ५ मे रोजी काही अटींसह जामीन मंजूर केला, ज्यामध्ये या प्रकरणाबाबत सार्वजनिक आणि पत्रकारांमध्ये बोलणे टाळणे समाविष्ट होते. तत्पूर्वी, लोकसभा सचिवालयाने गृह मंत्रालयामार्फत नवनीत राणा यांच्या अटकेबाबत महाराष्ट्र सरकारकडून अहवाल मागवला होता.