scorecardresearch

“आपणही पाच वर्षे मुख्यमंत्री होता तेव्हा औरंगजेबाला कवटाळून बसला होता का?”

संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल ; “उद्धव ठाकरेंचं कालचं भाषण हे अत्यंत सुपरहीट म्हणूनच तुम्ही अस्वस्थ.”, असंही म्हणाले आहेत.

(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केलेल्या भाषणानंतर आता भाजपा व शिवसेनेतील वातावरण पुन्हा एकदा कमालीचे तापल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याला प्रत्त्युत्तर दिले. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला असून, भाजपावर टीका केली आहे. औरंगाबादचं संभाजीनगर करण्याच्या मुद्य्यावरून आज फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी या टीकेला उत्तर दिलं.

“ आपणही पाच वर्षे मुख्यमंत्री होता, तेव्हा औरंगजेबाला कवटाळून बसला होता का? आपण हिंदुत्वाादी म्हणून आमच्यासोबत पाच वर्षे मुख्यमंत्री होतात ना? एखाद्या शहराचं नाव बदलायचं असेल, तर केंद्र सरकारची परवानगी लागते. केंद्र सरकारने त्याला परवानगी द्यावी लागते आणि मागील काही वर्षांपासून सरकार त्यासाठी केंद्रकडे प्रयत्न करत आहे . केंद्राने त्याला मंजुरी का दिली नाही? हे विचारावं लागेल. आपण पाच वर्षे मुख्यमंत्री असताना आपल्याला असं का वाटलं नाही? जसं योगींनी प्रयागराज करून घेतलं. तसं फडणवीसांनी औरंगाबादचं संभाजीनगर का केलं नाही? हा देखील प्रश्न आहे. आम्ही तर… बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हाच सांगून टाकलं की, संभाजीनगर झालं म्हणून आणि आमच्या हिशोबाने ते झालेलं आहे.”

“…या सगळ्या गोष्टी फडणवीसांच्या जन्माच्या अगोदरच्या आहेत” ; संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर

तर, “तुमचं हिंदुत्व कागदावरचं, भाषणातलं आहे. तुम्ही औरंगाबादचं संभाजीनगर करु शकले नाही, उस्मानाबादचे धाराशीव करु शकले नाही. पण तिथे अलाहाबादचं प्रयागराज झालं, त्यांनी ते करुन दाखवलं. तुम्ही फक्त बोलत राहिलात. हिंदुत्व जगावं लागतं, ते फक्त भाषणापुरतं मर्यादित नसतं. मोदींनी ते करुन दाखवलं आहे.” असं फडणवीस आज म्हणाले होते.

महाविकास आघाडी सरकारवरील टीकेला उत्तर –

भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारवर केल्या जाणाऱ्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “ फडणवीसवीस हे गोव्यातील सरकारबद्दल बोलत असतील. गोव्यातील सरकार अतिशय भ्रष्ट आणि बेशिस्त आहे. गोव्याचे राज्यपाल जेव्हा सत्यपाल मलिक हे होते, तेव्हा त्यांनीच सांगितलेलं आहे की एवढं भ्रष्ट सरकार मी पाहिलेलं नाही. अनेक माफिया, भूमाफिया, व्यभिचारी, दलाल हे भाजपाचे उमेदवार आहेत आणि त्याविरुद्ध मनोहर पर्रिकरांच्या कुटुंबातूनच बंड झालेलं आहे. हल्ली देवेंद्र फडणवीस हे गोव्यात जास्त असल्याने त्यांच्या डोक्यात गोव्याचं सरकार घुमतय.”

…हे आजचं विधान नाही, हे जुनं विधान आहे –

२५ वर्ष आम्ही युतीत सडलो असं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखल्यानंतर फडणवीसांनी केलेल्या टीकेवर बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, “उद्धव ठाकरे यांनी गोरेगावच्या एक जाहीर मेळाव्यात देवेंद्र फडणवीस असाताना हे विधान केलेलं आहे. हे आजचं विधान नाही, हे जुनं विधान आहे आणि त्या भूमिकेवर आम्ही सर्वजण ठाम आहोत. १९९२ साली बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत जो दंगा उसळला होता, ती हिंदुत्वाची या देशातली सगळ्या मोठी लढाई होती आणि ती लढाई लढताना हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आमच्या शेकडो शिवसैनिकांचं बलिदान झालेलं आहे. आम्ही सगळे वर्षानुवर्षे त्यासाठी माझ्यासह बाळासाहेब ठाकरे आम्ही न्यायालयासमोर उभे राहिलो, खटले लढवले तेव्हा आपण कुठे होतात ही लढाई लढताना? हा प्रश्न जर विचारला तर त्यांच्याजवळ उत्तर आहे का?”

नाय मातीत गाडलं, लोळवलं तर नाव सांगणार नाही म्हणणाऱ्या राऊतांना फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले “त्यांनी…”

याचबरोबर, “मागील ४० वर्षात केरळपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिम बंगालपासून इतर अनेक राज्यात तुमची डिपॉझिट किती जप्त झाली. हा इतिहास जर आम्ही काढत बसलो तर महागात पडेल. उत्तर प्रदेशचा विषय तूर्त बाजूला ठेवा, गोव्याकडे लक्ष द्या.” असंही संजय राऊत यांनी यावेळी बोलून दाखवलं.

भाजपा हा महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा विरोधी पक्ष आहे, आणि…-

शिवसेनेने भाजपाची साथ सोडल्यानंतर शिवसेना चौथ्या क्रमांकावर गेली असल्याच्या फडणवीसांच्या विधानावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “आमचा क्रमांक मोजू नका हे आकडे तुम्हाला महाग पडतील. आमच्याकडे बघताना तुम्ही आता महाविकासआघाडी म्हणून बेरीज करा आणि त्या बेरजेत तुम्ही कुठेच नाही आहात. तुम्हाला ४०-५० जागा जास्त मिळाल्या असतील, तुमचा पक्ष मोठा झाला असेल. नगरपंचायतीच्या निवडणुका या अनेकदा राजकीय पक्ष म्हणून लढल्या जात नाहीत, हे सगळ्यांना माहिती आहे. तरीही शिवसेनेचा आकडा हा अत्यंत आशादायक आहे आणि महाविकासआघाडी म्हणून जर आमची बेरीज बघितली, तर नक्कीच भाजपा हा महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा विरोधी पक्ष आहे आणि हा त्यांचा पहिला क्रमांक विरोधी पक्षाचा कायम राहो अशी माझी त्यांना शुभेच्छा आहे.”

तर मग तुम्ही एवढी मोठी पत्रकारपरिषद घेऊन वेळ का खात आहात? –

“उद्धव ठाकरे यांच्या भाषणात जर बोलायलाच काही नव्हतं, तर मग तुम्ही एवढी मोठी पत्रकारपरिषद घेऊन वेळ का खात आहात? माध्यमांचा, लोकाचा, स्वत:चा. दखल का घेत आहात तुम्ही?, तुम्हाला दखल घ्यावी लागली, तुम्हाला मिरच्या झोंबल्या, तुम्हाला ठसका लागला, बांबू लागला सगळं काही लागल्यामुळेच तुम्हाला स्वत: पत्रकारपरिषद घेऊन, उद्धव ठाकरे यांच्या भाषणासंदर्भात प्रत्येक शब्दावर खुलासा करावा लागतोय, याचा अर्थ असा आहे की उद्धव ठाकरे यांचं कालचं भाषण हे अत्यंत सुपरहीट, सणसणीत, खणखणीत आणि दणदणीत झालेलं आहे आणि त्यामुळे आपण सगळे अस्वस्थ आहात.” असंही यावेळी संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shiv sena leader sanjay raut criticizes devendra fadnavis msr

ताज्या बातम्या