विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असली तरी युतीचं काय होणार, या प्रश्नावरील पडदा अद्यापही दूर झालेला नाही. युतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपा-शिवसेनेतील नेत्यांकडून केल्या जात असलेल्या विधानांमुळे संभ्रम कायम आहे. दरम्यान, युतीच्या जागावाटपावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. “महाराष्ट्र इतका मोठा आहे. त्यातील या ज्या २८८ जागांचं वाटप आहे, ते भारत-पाकिस्तान फाळणीपेक्षाही भंयकर आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची आघाडी आणि जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर केला आहे. आता प्रश्न हा आहे की भाजपा आणि शिवसेना यांची युती होणार की नाही? झाली तर जागावाटप कसं होणार? मित्रपक्षांना किती जागा दिल्या जाणार? दोन्ही पक्षांच्या जागा समसमान असणार का? नेमकं काय काय घडणार याची उत्तरं अद्याप मतदारांना मिळालेली नाहीत.

दरम्यान, आज (२४ सप्टेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आमची युती होणारच असं दोन्हीकडच्या नेत्यांनी सांगितलं आहे. तरीही पत्रकार परिषदेत काय सांगणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. या पत्रकार परिषदेपूर्वी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ‘एनआय’शी संवाद साधला. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, “महाराष्ट्र खुप मोठा आहे. त्यातल्या २८८ जागांचे वाटप हे भारत-पाकिस्तान फाळणीपेक्षाही भंयकर आहे. सरकारमध्ये न बसता विरोधी बाकावर बसलो असतो तर आजचं चित्र वेगळ दिसलं असतं. जागा वाटपासंदर्भात जो काही निर्णय होईल ते आम्ही सांगू,”असं राऊत म्हणाले.