राफेल करार हा बोफोर्स घोटाळ्याचा बाप : संजय राऊत

निवडणुका लढवण्यासाठी पैसा उभा करण्यासाठी बोफोर्स आणि राफेलसारख्या व्यवहारांमधून पैसा उभा केला जातो हे देशाचे दुर्देव असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

sanjay-raut
संजय राऊत

राफेल डीलवरुन विरोधकांकडून सरकारवर सध्या टीकांचा भडीमार होत आहे. त्यातच शिवसेनेनेही भाजपावर या प्रकरणावरुन वेळोवेळी टीका केली आहे. आता पुन्हा एकदा शिवसेनेने राफेलवरुन मोदी सरकारवर कडवी टीका केली असून या व्यवहाराची तुलना थेट बोफोर्स घोटाळ्याशी केली. राफेल डील प्रकरण हे बोफोर्स घोटाळ्याचा बाप असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातील एका लेखातून राऊत यांनी सरकारवर हा हल्लाबोल केला आहे.

राऊत म्हणाले, बोफोर्स घोटाळ्यामध्ये काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या नातेवाईकांना ६५ कोटी रुपयांची दलाली मिळाल्याचा आरोप करणारेच आता सत्तेत आहेत. त्यांच्या राफेल जेट विमानांच्या व्यवहारात ७०० कोटी रुपये कुणाच्या खिशात गेले आहेत?, त्यामुळे राफेल डील तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप आहे. राफेल डीवरुन फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी भारत सरकारनेच रिलायन्सचे नाव सुचवल्याचे उघड केल्यानतंर आता हे ओलांद राहुल गांधींचे हस्तक किंवा देशद्रोही आहेत असे मानायचे का? असा सवालही खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

रिलायन्सच्या अनिल अंबानी यांना या विमानांचे कंत्राट दिले हा प्रश्नच नाही तर ५२६ कोटींचा खरेदी व्यवहार मोदी सरकारच्या काळात १५७० कोटींवर गेलाच कसा याचे स्पष्टीकरण सरकारने द्यायला हवे? म्हणजेच मधल्या व्यक्तीला यामध्ये प्रत्येक विमानामागे १००० कोटी रुपयांची दलाली मिळाली आहे, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. हा कसला सौदा आहे. भ्रष्टाचाराच्या पैशांमधून देशात निवडणुका लढवल्या जात आहेत. सरकारने बनत आहेत. निवडणुका लढवण्यासाठी पैसा उभा करण्यासाठी बोफोर्स आणि राफेलसारख्या व्यवहारांमधून पैसा उभा केला जातो हे देशाचे दुर्देव असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राहुल गांधी राफेलबाबत जे स्पष्टीकरण मागत आहेत त्यावरुन ते पाकिस्तानला मदत करीत असल्याचे भाजपा बोलत आहे. यापूर्वी ऐंशीच्या दशकात अशाच स्वरुपाचे आरोप बोफोर्स प्रकरणातही भाजपाने केले होते. त्यामुळे तेच आता पाकिस्तानला मदत करीत नाहीत का? असा सवालही राऊत यांनी विचारला आहे. त्यामुळेच भाजपा राफेल खरेदी प्रकरणातही घोटाळा झाल्याचे मान्य करीत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.

देशभरात सध्या केवळ राहुल गांधीच राफेलवरुन बोलत आहेत बाकीच्या सर्वांनी यावर शांत राहणे पसंद केले आहे. त्यामुळे राहुल गांधींचे भारताच्या राजकारणात महत्व वाढत असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shiv sena leader sanjay raut says rafale deal is father of bofors scam