मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील आमदारांना सभागृहात बोलू द्यावे तसेच या गटासाठी विधान भवनात दालन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली. विधानसभेत शिवसेना गटनेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मान्यता देण्यात आली. तसेच प्रतोद या गटाचे आहेत. यामुळे महत्त्वाच्या चर्चा किंवा विषयांवर शिवसेनेच्या आमदारांना बोलण्यास संधी मिळणार नाही. कारण चर्चेत सहभागी होण्याची नावे प्रतोदाकडून सादर करावी लागतात. हा तिढा सोडविण्याकरिताच विरोधी नेत्यांनी अध्यक्ष नार्वेकर यांची भेट घेतली. शिवसेना आमदारांना चर्चेत सहभागी होऊ द्यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावर चर्चेत सर्वाना समान न्याय दिला जाईल, असे आश्वासन नार्वेकर यांनी दिल्याचे पवार यांनी सांगितले. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या कार्यालयावर शिंदे गटाचा ताबा असल्याने ठाकरे गटाला विधान भवनात दालनासाठी जागा मिळावी, अशी मागणी करण्यात आली.