काश्मीरप्रश्नी पाकिस्तानशी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने हुर्रियत नेत्यांना दिलेल्या विशेष सवलतीवरून शिवसेनेने भाजप सरकारवर शरसंधान साधले आहे. सरडाही लाजेल असे रंग केंद्र सरकारकडून बदलले जातात तेव्हा हे यांना कसे जमते बुवा, असा सवाल जनतेला पडला असल्याची खोचक टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हुर्रियतप्रकरणी केंद्र सरकारचे हे घूमजाव म्हणजे अयोध्येतील राममंदिर ही बाबरीच होती अशी पलटी मारण्यासारखाच प्रकार असल्याचेही लेखात म्हटले आहे. सरडा किती वेळा आणि कसा रंग बदलतो याचा अभ्यास राजकारणी मंडळींनी आता करायलाच हवा. हुर्रियत आणि काश्मीरप्रश्नी केंद्र सरकार देखील रंग बदलण्याचेच काम करत आहे. हुर्रियत नेत्यांचे केंद्राकडून लाड सुरू असल्याचे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. पाकनिष्ठ व हिंदुस्थानद्रोही ठरवलेल्या हुर्रियत मंडळींना मांडीवर घेऊन त्यांचे लाडकोड सध्याच्या दिल्लीश्‍वरांनी चालवले आहेत. हुर्रियत ही सरळसरळ फुटीरतावादी संघटना आहे. कश्मीर सोडून इतर सर्व विषयांवर पाकिस्तानशी चर्चा करू असे मोदी सरकारचे म्हणणे कालपर्यंत होते. आता त्या भूमिकेत बदल झाला आहे व काँग्रेसनेही कश्मीरप्रश्‍नी घेतली नव्हती अशी बुळचट भूमिका विद्यमान सरकारने घेतली आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. हुर्रियतसारख्या फुटीरतावादी संघटनांना सवलत देऊन उद्या मसूद अझहर, दाऊद इब्राहिम, लख्वीसारख्यांशीही कश्मीरप्रश्‍नी चर्चा होईल, असा घणाघात देखील ‘सामना’तून करण्यात आला आहे.

दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सांगलीतील भाषणात देखील भाजप सरकारवर जोरदार शरसंधान साधले होते. जगात आपल्या देशातच अतिरेकी प्रवृत्तीचे लाड केले जातात, अन्य देशात अतिरेकी कारवाया करणाऱ्यांना कोणतीही दयामाया दाखविली जात नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच आम्ही घटना मानणारे आहोत, मात्र कोणी तरी उठतो आणि १५ मिनिटासाठी पोलिसांना बंदिस्त ठेवले तर आम्ही दिल्ली काबीज करण्याची भाषा करीत असेल तर शिवसेना बघ्याची भूमिका घेत बसणार नसल्याचेही ते भाषणात म्हणाले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mouthpiece saamna criticise bjp on hurriyat issue
First published on: 04-05-2016 at 08:57 IST