मुंबई : विरोधी पक्षात असल्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मिळत नव्हता, त्यासाठी आपण पक्षांतर केले, असा ठाकरे शिवसेनेच्या सहा फुटीर खासदारांनी केलेला दावा पूर्णपणे फोल निघाला आहे. ‘एम्पॉवर्ड इंडियन’ या संस्थेच्या पाहणीमध्ये या फुटीर खासदारांना प्राप्त विकास निधीपैकी जेमतेम १० टक्केसुद्धा निधी खर्च करण्यात यश आलेले नाही, असे वास्तव समोर आले आहे.

लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून राज्यात ६३ खासदार आहेत. Khasdaarala प्रतिवर्ष ५ कोटी विकास निधी प्राप्त होतो. शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांनी पहिल्या वर्षीच्या विकास निधीपैकी जेमतेम 10 टक्के सुद्धा रक्कम खर्च केलेली नाही. हिंगोलीच्या नागेश पाटील-आष्टीकर यांना १९ कोटी २ लाख निधी प्राप्त झाला होता. त्यांनी ७९ कामे सुचवली, पैकी २८ पूर्ण होऊ शकली असून त्यावर ५ कोटी ६ लाख (२६ टक्के) रुपये खर्च झाला.

परभणीच्या संजय जाधव यांना १४ कोटी ७० लाख निधी मंजूर झाला. त्यांनी ५६ कामे सुचवली होती. पैकी ३५ कामे पूर्ण झाली असून त्यावर ३ कोटी ७८ लाख (२५ टक्के) रुपये खर्चले आहेत. शिर्डीच्या भाऊसाहेब वाकचौरे यांना १४ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर होता, त्यामध्ये वाकचौरे यांनी १३५ कामांची शिफारस केली होती. पैकी केवळ २ कामे पूर्ण झाली असून ७१ लाख ३० हजार (४ टक्के) इतका विकास निधी खर्च झाला.

उस्मानाबादचे ओमराजे निंबाळकर यांना १८ कोटी ४७ लाख रुपये विकास निधी मिळाला होता. त्यामध्ये १३० कामे सुचवण्यात आली. त्यातील २१ कामे पुर्ण झाली असून १ कोटी ९७ लाख (१० टक्के) इतका निधी त्यावर खर्च झाला आहे. यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांना १८ कोटी ५६ लाख रुपये निधी मंजूर होता. त्यामधून देशमुख यांनी १०६ कामे सुचवली होती, त्यापैकी अवघी ७ कामे पूर्ण झाली असून त्यावर १ कोटी ४१ लाख रुपये (७ टक्के) खर्चले आहेत.

संजय दिना पाटीलनी खर्चला 1 टक्के निधी :

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय दिना पाटील यांना १४ कोटी ७० लाख निधी मंजुर करण्यात आला आहे. पाटील यांनी ४० कामांची शिफारस केली. त्यातील एकही काम पूर्ण झाले नाही. त्यांचा १५ लाख ५४ हजार (१ टक्के) इतका निधी खर्च होवू शकला. सहा फुटीर खासदारांमध्ये निधी खर्चण्यात पाटील सर्वात मागे आहेत.

काँग्रेस खासदार आघाडीवर :

निधी खर्च करण्यामध्ये महाराष्ट्रामधून काँग्रेस खासदारांनी आघाडी घेतली आहे. चंद्रकांत हंडोरे ६१ टक्के, वर्षा गायकवाड ५६ टक्के आणि इम्रान प्रतापगढी यांनी ४६ टक्के निधी खर्च करुन अव्वल स्थान पटकावले आहे.