scorecardresearch

संजय राऊतांनी ‘शिवतीर्थ’वर घेतली राज ठाकरेंची भेट; राज यांनी शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच पोहचले त्यांच्या घरी

काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राजभवानावर जाऊन राज्यपालांचीही भेट घेतली होती

संजय राऊतांनी ‘शिवतीर्थ’वर घेतली राज ठाकरेंची भेट; राज यांनी शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच पोहचले त्यांच्या घरी
संजय राऊत यांनी घेतली ठाकरे कुटुंबियांची भेट (फाइल फोटो सौजन्य आयएएनएस आणि इंडियन एक्सप्रेस)

राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी बाजूला सारुन अनेकदा राजकीय नेते खासगी कारणांसाठी एकमेकांची सदिच्छा भेट घेताना दिसतात. अशीच एक भेट आज मुंबईमधील दादरमध्ये पार पडली. शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. अर्थात ही भेट राजकीय कारणांसाठी नव्हती तर अत्यंत खासगी आणि खास कारणासाठी होती.

संजय राऊत हे सपत्नीक राज यांच्या नव्या घरी ‘शिवतीर्थ’ला भेटीसाठी गेले होते. सुमारे अर्धा तास ही भेट झाली. मुलीच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी. राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राऊत राज यांच्या घरी गेले होते. या खासगी भेटीनंतर राऊत राज यांच्या घराबाहेर पडले तेव्हा राज आणि शर्मिला ठाकरे हे त्यांना अगदी गाडीपर्यंत सोडण्यासाठी आले होते.

काही दिवसांपूर्वी म्हणजे १० नोव्हेंबर रोजी राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. दक्षिण मुंबईमधील सिलव्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी राऊत यांनी पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनाही लग्नाचं आमंत्रण दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी राऊत यांनी राजभवानावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना राऊत यांनी ही सदिच्छा भेट होती आणि या भेटीमागील मुख्य कारण हे राज्यपालांना मुलीच्या लग्नाचं आमंत्रण देण्याचं होतं, असं राऊत यांनी स्पष्ट केलं होतं.

राऊत यांनी मुलगी पुर्वशीचा २९ नोव्हेंबरला मुंबईत लग्न सोहळा आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर जवळपास १६ वर्षांनी संजय राऊत हे राज यांच्या निवासस्थानी आले होते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-11-2021 at 13:10 IST

संबंधित बातम्या