बाळासाहेबांचे स्मारक शिवसेना स्वबळावर का करू शकत नाही, शरद पवारांची मदत स्मारकासाठी का घेतली जाते, असे सवाल करीत सेना नेतृत्वावर टीका केल्याबद्दल माजी खासदार मोहन रावले यांना पक्षातून काढल्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मुंबईत तुल्यबळ उमेदवार देण्यावरून शिवसेनेचीच कोंडी झाली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांच्या विरोधात शिवसेनेचे मोहन रावले या लढतीची अपेक्षा असताना मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. पाच वेळा खासदार असलेले मोहन रावले या लढतीत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. मनसेविषयी असलेले आकर्षण हे यामागील महत्त्वाचे कारण होते.
येत्या लोकसभा निवडणुकीत मात्र उमेदवारीसाठी मोहन रावले यांना डावलून अरविंद सावंत यांचे नाव पुढे आणले जात असून, त्या दृष्टीने गेले वर्षभर लोकसभा मतदारसंघात सावंत यांच्या उपस्थितीत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या काळात मोहन रावले यांना जवळपास प्रत्येक कार्यक्रमापासून दूर तर ठेवण्यात आले. यामुळे अस्वस्थ झालेल्या रावले यांनी बंडाचा झेंडा फडकवताच त्यांची हकालपट्टी करण्यात आली. रावले हे नजीकच्या काळात मनसेत प्रवेश करून मनसेच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवतील, मात्र हा निर्णय राज ठाकरे हेच जाहीर करतील, असे मनसेच्या एका आमदाराने सांगितले. रावले यांचा शिवसेनेत तळातील कार्यकर्त्यांशी असलेला अनेक वर्षांचा संबंध तसेच मनसेचा प्रभाव लक्षात घेता रावले यांना मनसेने उमेदवारी दिल्यास एकाच वेळी देवरा व रावले यांच्याशी टक्कर देणारा सेनेकडे तुल्यबळ उमेदवार नाही, हे वास्तव असल्याचे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्यानेही नाव जाहीर न करण्याच्या अटीवर मान्य केले.
दरम्यान, या मतदारसंघात देवरा यांचा मार्ग निर्धोक राहावा यासाठी मोर्चेबांधणी सुरू असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. उद्योगक्षेत्रातील काही बडय़ा मंडळींनी या कामी पुढाकार घेतला असून, देवरा यांच्यासाठी प्रतिस्पर्धी राजकीय नेत्यांकडे आपले वजन खर्ची घालण्यास सुरुवात केल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपच्या एका वजनदार आमदाराने या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने तयारीही सुरू केली होती, मात्र उद्योगक्षेत्रातील या बडय़ांच्या हस्तक्षेपानंतर त्याने काढता पाय घेतला, असे सांगण्यात येते. आपण लोकसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुकच नव्हतो, असे हा आमदार आता सांगत असून सेना-भाजपने तर यावर मौनच धारण केले आहे.