scorecardresearch

गणेशोत्सवानंतर दसरा मेळाव्यावर निर्णय ; पालिका अधिकाऱ्यांचे संकेत, शिवसेना आयुक्तांकडे दाद मागणार

शिवसेनेवरील नियंत्रण  यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे.

गणेशोत्सवानंतर दसरा मेळाव्यावर निर्णय ; पालिका अधिकाऱ्यांचे संकेत, शिवसेना आयुक्तांकडे दाद मागणार
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : दादरच्या शिवाजी पार्कवर पारंपरिक दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेच्या वतीने आठवडाभरापूर्वी अर्ज सादर करूनही  त्याला परवानगी मिळालेली नसल्याने भाजप आणि शिंदे गट कुरघोडी करीत असल्याची शंका शिवसेनेच्या गोटात निर्माण झाली आहे. शिवसेनेने आता महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांच्याकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. तर सध्या महापालिकेचे  कर्मचारी गणेशोत्सवाच्या कामांमध्ये गुंतलेले असल्याने गणेशोत्सव संपल्यावर त्यावर निर्णय होईल, असे महापालिकेच्या सहायक आयुक्तांनी  स्पष्ट केले.

शिवसेनेवरील नियंत्रण  यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. त्याचेच प्रत्यंतर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगीवरून दिसून आले. शिवसेनेने अर्ज देऊन आठवडा उलटल्यानंतरही महापालिकेने त्यास परवानगी दिलेली नाही.  त्यामुळे दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार की नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. तर नियमांत बसेल तसे होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिल्याने शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून कुरघोडीचे राजकारण रंगणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 शिवसेनेचा दसरा मेळावा हा गेल्या ६ दशकांपासून शिवाजी पार्कवर होतो. करोनाचे संकट लक्षात घेऊन मागील दोन वर्षे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा झाला नव्हता.  यंदा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार शिवसेनेने परवानगीचा अर्ज महापालिकेच्या जी-उत्तर कार्यालयात सादर केला. याबाबत जी-उत्तरचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या आमचे सर्व कर्मचारी-अधिकारी गणेशोत्सवाशी निगडित कामांमध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या अर्जावर गणेशोत्सवानंतर निर्णय होईल, असे सपकाळे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबतचा पहिला अर्ज आम्ही २२ ऑगस्टला जी-उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तांना दिला. त्यावेळी दिवसभरात तो पुढील कार्यवाहीसाठी वरती पाठवतो, असे उत्तर त्यांनी दिले. दुसऱ्या दिवशी त्याबाबत चौकशी केली असता, थोडा वेळ लागेल, चौकशी करावी लागेल अशी उडावाउडवीची उत्तरे देत त्यांनी घूमजाव केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला. त्यामुळे २६ ऑगस्टला आम्ही पुन्हा एकदा सहायक आयुक्तांना स्मरणपत्र दिले. तसेच महापालिकेचे  आयुक्त इक्बालसिंह चहल यांनाही पत्र दिले. शिवाजी पार्क सार्वजनिक सभेसाठी देण्याबाबत काढलेल्या आदेशात दसऱ्याचा उल्लेख आहे. त्यामुळे तांत्रिक-कायदेशीर कसलीही अडचण नाही. तरीही जाणीवपूर्वक हे राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे. आम्ही सोमवारी महापालिका आयुक्त चहल यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत, असे सांगत शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशाराही विनायक राऊत यांनी दिला.

शिंदे गटाचा शिवाजी पार्कमध्ये मेळावा नाही

आम्ही दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याबाबत कसलाही अर्ज केलेला नाही. त्यांच्यासोबत जे काही उरलेले लोक आहेत त्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू आहे. दसरा मेळावा हा हिंदूत्वाच्या विचारांसाठी होता. पण नवाब मलिक यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घेऊ शकले नाहीत ते काय हिंदूत्वाचे विचार देणार, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shiv sena not yet received permission of dussehra rally held at dadar shivaji park zws

ताज्या बातम्या