पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातून विकासाचा मुद्दा गायब झाला असून ते आता स्वत:च्याच राज्यात हमरीतुमरीवर आले आहेत. ज्या राज्यात २२ वर्षे राज्य केले तिथे खालच्या पातळीवर प्रचार करण्याची वेळ भाजपवर का आली असा सवाल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचारात ‘अफझलखान’, ‘शाईस्तेखान’ यांचा प्रवेश प्रचारात होताच. भाजपने सेनेच्या नेत्यांना प्रचार पातळी सोडल्याचे लक्षण असल्याचे सांगितले हेाते. पण गुजरातच्या प्रचारसभातून स्वत: पंतप्रधान मोदी यांनीच ‘मुगल’ राजवट कबरीतून उकरून काढल्याचा आरोप त्यांनी केला. गुजरातचा प्रचार विकासाच्या मुद्यावर होणे गरजेचे होते. पण मोदींच्या भाषणातून विकासाचा मुद्दा गायब झाला असून ते आपल्याच राज्यात हमरीतुमरीवर आल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांच्या बाबत ‘नीच’ असा शब्द वापरल्यानंतर तो देशाचा नव्हे तर गुजरातचा अपमान झाल्याचे मोदी सांगत सुटले आहेत. राष्ट्रीय बाणा वगैरे दाखवून विरोधकांना गप्प करणारे मोदी आता गुजरातीत अस्मितेत अडकले असल्याची वर्मी टीका ही त्यांनी केली.

शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातील अग्रलेखातून ठाकरे यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली. गुजरात निवडणुकीत मोदी हे राष्ट्रीय कमी व क्षेत्रीय जास्त झाले आहेत. इतरांनी त्यांच्या प्रांतीय अस्मितेच्या तलवारी उपसल्या की, त्यांनी राष्ट्रीय बाणा दाखवत गप्प करणारे मोदी सध्या गुजराती अस्मितेत अडकले आहेत. ज्या राज्यात इतके वर्षे राज्य केले. त्या राज्यात केंद्रीय मंत्रिमंडळ, भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री, पदाधिकारी यांना घेऊन राहुल गांधी यांच्या विरोधात तुताऱ्या का फुंकत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. विकासाचा मुद्दाही बिनकामाचा असल्याचे भाजपने गुजरातेत दाखवून दिल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे…

– परंपरेप्रमाणे गुजरातमध्येही ‘इव्हीएम’ घोटाळे उघड झाले असून भाजपपुरस्कृत निवडणूक आयोगासमोर याबाबत टीका करणे काही उपयोगाचे नाही.

– पंतप्रधानही प्रचार सभांतून स्वतःच्याच राज्यात हमरीतुमरीवर आले.

– भाजप जाहीरनामा काढायला विसरून गेला आणि विकासावर कोणी बोललेच नाही. व्यासपीठावर अश्रू ढाळणे, तांडव करणे व भावनिक भाषणे करणे एवढय़ापुरतेच गुजरात निवडणुकीचे महत्त्व उरले.