मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शनिवारी मुंबईत जाहीर सभा होत असून मुख्यमंत्री झाल्यानंतरची अशा प्रकारची ही पहिलीच राजकीय सभा असणार आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वत:च संकेत दिल्याप्रमाणे या सभेत ते विरोधकांचा समाचार घेत राजकीय हल्ला चढवतील, असे दिसते.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर चार महिन्यांतच करोनाची टाळेबंदी लागली. त्यामुळे खुल्या मैदानावरील शिवसेनेचा दसरा मेळाव्यासह इतर राजकीय जाहीर सभा झाल्या नाहीत. निर्बंध शिथिल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन किंवा सभागृहात राजकीय मेळावे घेतले. पण शिवसेनेची ओळख असलेली खुल्या मैदानातील राजकीय सभा अडीच वर्षांत प्रथमच होणार आहे. त्यामुळे ही सभा मोठी व्हावी यासाठी शिवसेनेने नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले आहेत.

राज्यात हिंदुत्वावरून सुरू असलेले राजकारण आणि त्यात शिवसेनेची कोंडी करण्याचे भाजप-मनसेचे प्रयत्न यामुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे. खासदारांच्या आणि पक्ष प्रवक्त्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचे आदेश दिले होते. त्यातून ठाकरे यांचा मनोदय स्पष्ट झाला होता. याचबरोबर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही तोंडावर आहेत. त्यासाठी शिवसंपर्क अभियान सुरू करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात विदर्भ व मराठवाडय़ात शिवसंपर्क अभियान पार पडले.