शिवसेनेचा इशारा

राज्यपालांनी ३१ जुलैपर्यंत मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या सर्व परीक्षांचे निकाल लावण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात उद्यापर्यंत सर्व निकाल लागणे शक्य नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या परिस्थितीची माहिती असूनही ३१ जुलैपर्यंत सर्व निकाल लागतील, असे विधिमंडळात सांगणाऱ्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याविरोधात हक्कभंग मांडण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

कुलगुरू संजय देशमुख यांच्या मनमानी कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करून सर्वपक्षीय आमदारांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच निकाल वेळेवर लावण्यासाठीची मागणी विधान परिषदेत लावून धरली. त्यावेळी उत्तरपत्रिका तपासणीची माहिती आपण घेतली असून राज्यपालांनी दिलेल्या मुदतीतच निकाल जाहीर होतील, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले होते. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर न झल्यास विनोद तावडे यांच्याविरोधात आपण हक्कभंग मांडू, असे शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सांगितले. युवासेनेने वेळेवर निकाल लागावे यासाठी वेळोवेळी पाठपुरवा केला होता. तसेच ऑनलाइन तपासणीमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन कुलगुरू देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले होते. त्याचवेळी कोणत्याही परिस्थितीत ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर होतील, असे तावडे विधान परिषदेत सांगितल्यामुळे शिवसेना आता तावडे यांच्याविरोधात आक्रमक बनली आहे.

उद्यापर्यंत सर्व निकाल जाहीर न झाल्यास तावडे यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याबरोबरच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी शिवसेनेकडून केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेने काय करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. विधानसभेतील सदस्यांच्या हक्कांबरोबरच विद्यार्थ्यांच्याही हक्कांची मला जास्त काळजी आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल लागून विद्यार्थ्यांचे हित जपण्याला माझे प्राधान्य आहे.

– विनोद तावडे, शिक्षणमंत्री