बाळासाहेबांसमोर माना झुकवणाऱ्या नेत्यांना जुन्या दिवसांचा विसर, सेनेचा भाजपला टोला

शिवसेना भवनाच्या परिसरात फलक लावण्यात आले आहेत

विधानसभा निवडणुकांनंतर नाईलाजाने सेना-भाजप युतीत लहान भावाच्या भूमिकेत गेलेल्या शिवसेनेने बुधवारी भाजपला गतकाळात केलेल्या उपकारांची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. मुंबईपरिसरात फलक लावून सेनेने बाळासाहेबांसमोर माना झुकवणारे नेते जुने दिवस कसे विसरले, असा सवाल उपस्थित केला . या फलकावर बाळासाहेबांसमोर नतमस्तक झालेल्या नेत्यांची छायाचित्रे छापण्यात आली आहेत. यामध्ये नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अटलबिहारी वाजपेयी, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस या भाजप नेत्यांसह राष्ट्रवादीचे शरद पवार आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांचादेखील समावेश आहे. सध्या गर्विष्ठपणे वावरणाऱ्या नेत्यांच्या माना बाळासाहेबांसमोर कशा झुकल्या होत्या, हेच दाखविण्याचा प्रयत्न सेनेने या फलकाच्या माध्यमातून केला आहे.
बाळासाहेब ठाकरे राजकारणात सक्रिय असताना भाजपचा दिल्लीतून येणारा प्रत्येक नेता मातोश्रीवर आवर्जून हजेरी लावत असे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या काळात मातोश्रीवरील भाजप नेत्यांचा राबता कमी झाला होता. विधानसभा निवडणुकीत एकमेकांपासून फारकत घेतल्यानंतर सेना आणि भाजपमधील दरी अधिकच रूंदावली होती. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानला विरोध करण्याच्या मुद्द्यावरून उभय पक्षांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमवीर सेनेकडून मुंबईत शिवसेना भवनाचा परिसर, घाटकोपर आणि अन्य भागात हे फलक लावण्यात आले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shiv sena remind bjp about old days in balasaheb thackerays period

ताज्या बातम्या