संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे, गणेश नाईक या शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नेत्यांची राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिली नव्हती. पण यापैकी कोणत्याच नेत्यांची इच्छा अद्याप फळाला आलेली नाही. पण शिवसेनेत बंडाचे निशाण रोवताच भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे यांना तात्काळ मुख्यमंत्रीपद मिळाले व राज्याचे नेतृत्व करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. 

शिवसेनेत बंड केले त्या सर्वच नेत्यांना राज्याचे नेतृत्व करण्याची राजकीय महत्त्वाकांक्षा होती. राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी मनसेची स्थापना केली. राज्याचे नेतृत्व करण्याची त्यांची इच्छा त्यांनी वारंवार बोलून दाखविली. राज्याच्या विकासाचा कार्यक्रम (ब्ल्यू प्रिंट) त्यांनी जाहीर केला. राज्याच्या विकासासाठी आपल्याकडे नेतृत्व द्यावे, असे त्यांनी जनतेला आवाहन केले होते. मनसे हा राज्यातील महत्त्वाचा आणि प्रभावी घटक असेल, असे अनेकदा सांगितले. पहिल्या फटक्यात राज ठाकरे यांच्या पक्षाचे १३ आमदार निवडून आले. एवढे आमदार निवडून येणे हे सोपे नसते. पण राज ठाकरे यांना ते सातत्य पुढे राखता आले नाही.

नारायण राणे यांनी बंड पुकारल्यावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा आपल्याला मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन देण्यात आले होते, असे राणे यांनी उघडपणे सांगितले होते. राज्यात नेतृत्व बदल होणार आणि आपणच मुख्यमंत्री होणार, असा दावा राणे करीत असत. राणे हे मुख्यमंत्रीपदावर दावा सांगत असताना काँग्रेसने अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण या  दोघांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. पण राणे हे फक्त दावाच करीत राहिले. शेवटी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. भाजपने तर त्यांना थेट दिल्लीतच पाठविले. शिवसेनेचे पहिले बंड करणारे छगन भुजबळ यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा समता परिषदेच्या व्यासपीठावरून केला जात असे.  भुजबळ यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नव्हती.

राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता असताना नवी मुंबईतील शक्तिमान नेते गणेश नाईक यांचीही महत्त्वाकांक्षा जागृत झाली होती. कारण तेव्हा नाईक हे ‘मातोश्री’च्या गळय़ातील ताईत होते. गणेश नाईक हे शिवसेनेला आर्थिक ताकद देत होते. शिवसेनेसाठी १०० रुग्णवाहिका नाईकांनी दिल्या होत्या. हात उदार सोडणाऱ्या नाईकांबद्दल पक्षातही चांगली भावना होती. मनोहर जोशी तेव्हा मुख्यमंत्री होते. एक बडय़ा उद्योगपतीचा गणेश नाईकांवर वरदहस्त होता. यामुळे गणेश नाईक हे मुख्यमंत्री होणार अशी कुजबूज त्यांच्या समर्थकांकडून सुरू झाली. काही जणांनी तर तारखांचा वायदा केला. पुढे मातोश्रीशी बिनसले आणि गणेश नाईक हे शिवसेनेतून बाहेर पडले.

शिंदे यांची इच्छापूर्ती

२०१४ मध्ये शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपेदी निवड झाल्यापासून एकनाथ शिंदे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढू लागली. भाजपबरोबर युती झाली आणि औट घटकेचे विरोधी पक्षनेतेपद सोडून शिंदे हे फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले. कधी ना कधी शिंदे हे राज्याचे नेतृत्व करणार हे त्यांचे समर्थक खासगीत सांगायचे.  २०१९ मध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळणार या आशेवर शिंदे होते. पण उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे अशी गळ शरद पवार यांनी घातली. तेव्हा हातातोंडाशी आलेला घास गेल्याचे दु :ख शिंदे यांना होते. संधी मिळताच त्यांनी शिवसेनेत बंड केले. आता भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले. शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांपैकी शिंदे यांनाच राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. अर्थात भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या आशीर्वादामुळे हे सारे घडले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena shinde chance lead politics leaders ysh
First published on: 02-07-2022 at 00:02 IST