महाराष्ट्रात येऊ घातलेला वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे राज्य सरकारवर टीका होत असून आता शिवसेनेने राज्य सरकारच्या विरोधात निषेध स्वाक्षरी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.सध्या ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने योग्य वाटाघाटी न केल्याने हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र शिवसेनेने या प्रकरणावरून शिंदे सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे. जनमानसात या मुद्द्यावरून शिंदे सरकारविरोधात असलेला रोष लक्षात घेऊन शिवसेनेने ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहीम सुरू केली केली आहे.

हेही वाचा >>> तपास यंत्रणा संसदेपेक्षा श्रेष्ठ आहेत का? ; जामिनावरील आरोपीला दिसताक्षणीच ताब्यात घेण्याच्या आदेशावरून न्यायालयाचे ताशेरे

प्रकल्पाच्या पळवापळवीबाबतच्या जनक्षोभाला वाट मोकळी करून देण्याकरिता शिवसेनेने ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहिमेसाठी फलक लावले आहेत. शिवसेनेने शिवडी विधानसभा मतदारसंघातील एलफिन्स्टन परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाजवळ स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्रात येऊ घातलेला ‘वेदांत आणि फॉक्सकॉन’ प्रकल्प ‘खोके सरकारच्या’ हलगर्जीपणामुळे गुजरातमध्ये गेला. यामुळे १ लाख तरुणांचा रोजगार गेला, याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी तसेच महाराष्ट्र प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन समाज माध्यमांवरून करण्यात आले आहे.