काश्मीरमधील परिस्थिती चिघळली आहे. पाकिस्तानने सरळसरळ युद्ध पुकारले आहे. अमेरिकेने पाकिस्तानमध्ये घुसून लादेनला संपवले होते. तशी हिंमत दाखवणार नसाल तर मोदीजी तुमच्या आंतरराष्ट्रीय स्थानाचा देशाला फायदा काय असा थेट सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. ४ दहशतवादी १७ जवानांचा बळी घेतात हे संभाव्य महासत्तेस शोभनीय नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

जम्मू काश्मीरमधील उरी येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. काश्मीरमध्ये सध्या काँग्रेस राजवटीपेक्षा जास्त परिस्थिती बिघडली आहे. भाजपचे राजकीय प्रयोग अपयशी ठरले. पण देशातले सर्वच राज्यकर्ते इशारे देण्याशिवाय काहीच करत नाही अशी टीका शिवसेनेने केली आहे. हाफीज सईदसारखा दहशतवादी भारतावर हल्ला करुन धडा शिकवण्याी भाषा वापरतो. पण आपण पाकिस्तानविरोधात फक्त पुरावे शोधतो. पठाणकोटपाठोपाठ या हल्ल्यातही आपण हेच करणार आहोत. आपण शोधलेले पुरावे आंतरराष्ट्रीय पातळीवर कवडीमोलाचे असतात. त्यामुळे भारताने अमेरिकेसारखे शौर्य दाखवावे असे शिवसेनेने म्हटले आहे. रशियाचे पुतिन आणि अमेरिकेचे ओबामा हे मोदींचे मित्र असतील. पण त्यांना आलिंगन दिल्याने पाकिस्तानची बोबडी वळत नाही. हे नेते काश्मीर आणि पाकिस्तानच्या बाबतीत मदत करणार नाही असे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. काश्मीरमध्ये लहान मुलही लष्करावर हल्ले करतात. पण आपण काही करत नाही. खरेतर जम्मू काश्मीरमध्ये मार्शल लॉ लागू केला पाहिजे अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने मांडली आहे.

पाकिस्तानच्या चार दहशतवाद्यांना जे जमते ते भारताच्या बलाढ्य सेनेला का जमत नाही असा सवालही शिवसेनेन उपस्थित केला आहे. बलुचिस्तानच्या मूठभर बंडखोरांना पाठिंबा देणे हा काश्मीर प्रश्नावरील उत्तर नाही. हल्ल्यात मारल्या गेलेल्या जवानांना शहीदाचा दर्जा देऊन आणि पुष्पचक्र देऊन हे संपणार नाही, आता भारतीय लष्कराला बळ देण्याची गरज आहे असा सल्लाही शिवसेनेने दिला आहे. उरी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी दिलेला इशारा योग्यच आहे. पण पाकिस्तानसारख्या देशावर त्याचा परिणाम होणार नाही असा दावाही शिवसेनेने केला आहे. मोदींचा वाढदिवस साजरा झाला असतानाच दहशतवाद्यांनी हल्ला करुन मोदींच्या जागतिक प्रतिमेस तडा दिल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

[jwplayer EztVJWax]