मुंबई : मुंबई महापालिकेच्या पहिल्याच विशेष सभेला ठाकरे बंधू युतीमध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले. महापौर निवडीच्या वेळी पालिका आयुक्तांना पीठासीन अधिकारी केल्याच्या निषेधार्थ शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. उपमहापौर संजय घाडी यांचे भाषण सुरू होताच ठाकरे यांचे शिवसैनिक सभागृहाबाहेर गेले. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नगरसेवक कामकाज पूर्ण होईपर्यंत सभागृहातच बसून होते.
मुंबई महापालिकेची निवडणूक यावेळी ठाकरे बंधूंनी एकत्र लढवली. ठाकरे बंधूंची युती विरुद्ध भाजप आणि शिवसेना (शिंदे) महायुती अशी प्रमुख लढत झाली होती. अत्यंत गाजावाजा करीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकत्र आले. ‘एकत्र आलो… एकत्र राहण्यासाठी’, अशी भविष्यवाणी उद्धव ठाकरे यांनी केली. कार्यकर्त्यांचेही मनोमिलन झाल्याचे दाखले दिले जाऊ लागले. मात्र निवडणुकीत मनसेचे केवळ ६ नगरसेवक जिंकले. ठाकरे बंधूंची ही युती पालिकेच्या पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळात राहणार का याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे. मात्र पहिल्याच दिवशी या दोन गटांची तोंडे दोन दिशेला असल्याचे चित्र दिसले.
महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडीसाठी बोलवलेल्या विशेष सभेत पालिका आयुक्त भूषण गगराणी हे विशेष बैठकीचे पिठासीन अधिकारी होते. आयुक्तांना पिठासीन अधिकारी पदी नेमण्यास शिवसेनेच्या (ठाकरे) गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे आक्षेप घेतला. मात्र पीठासीन अधिकारीपदी बसलेल्या पालिका आयुक्तांनी हा हरकतीचा मुद्दा फेटाळून लावला. त्यानंतर महापौर व उपमहापौरांची निवड झाली. महापौरांचे भाषण झाले तेव्हा ठाकरे यांचे शिवसैनिक शांत बसले होते. मात्र उपमहापौर, शिवसेना (शिंदे) पक्षाचे नगरसेवक संजय घाडी यांचे भाषण सुरू होताच शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या शिवसैनिकांनी सभात्याग केला. भाषणाच्या लेखी प्रतीचे कागद फाडून सगळे नगरसेवक बाहेर पडले. ‘पन्नास खोके एकदम ओके’, ‘गद्दार… गद्दार…’ अशा घोषणा देत हे नगरसेवक सभागृहाबाहेर पडले.
मनसेच्या नगरसेवकांना कल्पनाच नाही
ठाकरे यांचे शिवसैनिक सभागृहातून बाहेर पडले तरी मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार आणि पाच नगरसेविका हे सभागृहातच होते. दरम्यान, सभात्याग करण्याबाबत आम्हाला काहीही कल्पना देण्यात आली नव्हती. आम्ही मागच्या बाकांवर बसलो होतो. पुढे काय चालले होते, काय ठरले याची आम्हाला कल्पना नव्हती असे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला काहीच मदत केली नाही अशी तक्रार नुकतीच पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये काहीच आलबेल नसल्याची चर्चा आहे.
