मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांना माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी आणि शिवडी विधानसभा मतदारसंघातून मतांची मोठी रसद मिळू शकली नाही. सावंत यांना वरळीतून केवळ ६,४०३, तर शिवडीतून १६ हजार ९०३ मतांची आघाडी मिळाली.वरळीमध्ये तीन विद्यामान आमदार, दोन महापौर, एक माजी महापौर आणि जुन्या फळीतील मुरब्बी पदाधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा असतानाही सावंत यांना मोठे मताधिक्य मिळू शकले नाही. उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र त्याच वेळी प्रतिस्पर्धी यामिनी जाधव यांच्या भायखळा आणि काँग्रेस आमदार अमिन पटेल यांच्या मुंबादेवी मतदारसंघाने सावंत यांच्या झोळीत भरभरून मतांचे दान टाकले.

भाजप आमदार असलेल्या कुलाबा, मलबार हिल मतदारसंघातून अरविंद सावंत यांना अनुक्रमे ४८,९१३ आणि ३९,५७३ मते मिळाली, तर यामिनी जाधव यांच्या पारड्यात अनुक्रमे ४३,८७५ आणि ८७,८६७ मते पडली. मुंबादेवी, वरळी, भायखळा आणि शिवडी या मतदारसंघातून अरविंद सावंत यांना अनुक्रमे ७७,५२३, ६४,८३२, ८६,२९२ आणि ७६,०५३, तर यामिनी जाधव यांना अनुक्रमे ३६,६९०, ५८,४२९, ४०,८१७ आणि ५९,१५० मते मिळाली. यामिनी जाधव यांना त्यांच्या भायखळा विधानसभा मतदारसंघातून फारच कमी मते मिळाली. त्याच वेळी या मतदारसंघाने अरविंद सावंत यांचे पारडे जड केले. त्यांना भायखळ्यातून ४५,४७५ मताधिक्य मिळाले. तसेच मुंबादेवी मतदारसंघातून ४०,८३३ मताधिक्य मिळाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार असलेल्या वरळी आणि शिवडी मतदारसंघांतून अनुक्रमे ६,४०३ आणि १६,९०३ मताधिक्य मिळाले. तर भाजप आमदार असलेल्या कुलाब्यातून ५,०३८ मताधिक्य सावंत यांच्या पारड्यात पडले. मात्र मलबार हिल येथे यामिनी जाधव यांना ४८,२९४ मताधिक्य मिळाले.

हेही वाचा >>>राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एका जागेसाठी सहा विद्यार्थी स्पर्धेत

वरळी मतदारसंघातूनही सावंत यांना फारच कमी मताधिक्य मिळाले आहे. या लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे, सचिन अहिर, सुनील शिंदे (विधान परिषद आमदार), माजी महापौर किशोरी पेडणेकर, स्नेहल आंबेकर, माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर आणि मातबर पदाधिकारी आहेत. असे असतानाही या मतदारसंघातून सावंत यांना ६,४०३ मताधिक्य मिळाले.