मुंबई : मुंबई महानगरपालिकेत प्रशासकीय राजवटीच्या काळात काढण्यात आलेल्या एक हजार कोटींच्या कामांच्या निविदा रद्द करण्यावरून गरम झालेले राजकारण थंड झालेले नाही. एक हजार कोटींच्या निविदा रद्द करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता नुसत्या निविदा रद्द करून चालणार नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना (ठाकरे) पक्षाने केली आहे.

मुंबई महापालिका प्रशासनाने गेल्या काही काळात एक हजार कोटींच्या चार निविदा रद्द केल्या आहेत. त्यात रस्त्यांवर रंगांचे पट्टे मारण्याच्या कामाची दिडशे कोटींची निविदा, पदपथावर रेलिंग लावण्याची ३४५ कोटींची निविदा, प्राणी संग्रहालयाचा विस्तार करण्याची ४९० कोटींची निविदा आणि शालेय वस्तू खरेदीची १५० कोटींची निविदा या चार निविदांचा समावेश आहे.

या निविदा रद्द करण्यावरून महापालिकेत सध्या राजकारण तापले आहे. मुंबईकरांचा पैसा वाचवला म्हणून सत्ताधारी पक्षाने स्वत:ची पाठ थोपटून घेतली असली तरी या विषयावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षावरच टीका केली आहे. सत्ताधारी पक्षापैकी शिवसेना (शिंदे) पक्षाचे गटनेते अमेय घोले यांनी सोमवारी या विषयावरून शिवसेना (ठाकरे) पक्षावर टीका केली होती. निविदा रद्द केल्यामुळे नक्की धक्का कोणाला बसला असा सूचक प्रश्न घोले यांनी उपस्थित केला होता.

दरम्यान, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी महापौर रितू तावडे यांना पत्र लिहून या प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. ही निविदा प्रक्रिया एका दिवसात झालेली नाही. ती काढण्यासाठी संबंधित खात्याचे प्रमुख, त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्तांपासून ते आयुक्तांपर्यंत मंजुरी घेण्यात आली होती. जास्त रकमेची निविदा काढली म्हणून ती रद्द केली असेल तर ही निविदा ज्यांनी काढली त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी पडवळ यांनी केली आहे.

तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो…. तसेच निविदा काढण्यासाठी जो वेळ वाया गेला त्यासाठीही कारवाई होणे गरजेचे आहे. निविदा काढण्यासाठी महानगरपालिकेचा निधी वाया गेला, शैक्षणिक साहित्य किंवा इतर काही वस्तू त्याचा खर्च त्या संबंधित अधिकाऱ्यांकडून सत्ताधारी पक्ष वसूल करणार आहे का? असा प्रश्नही पडवळ यांनी उपस्थित केला आहे. ज्यांनी निविदेचा अंदाजित खर्च काढला, ज्यांनी निविदेसाठी मान्यता दिली त्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई केली तरच सत्ताधारी पक्ष जे बोलतो आहे त्यात तथ्य आहे असे म्हणता येईल, असेही या पत्रात म्हटले आहे. अन्यथा तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो अशी सत्ताधारी पक्षांची भूमिका आहे असे वाटेल असाही टोला पडवळ यांनी लगावला आहे.