मुंबई : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. भोंदूबाबा अशोक खरातच्या दरबारात जाणाऱ्या सर्व मंत्र्यांना सहआरोपी करा. महाराष्ट्र हा पुरोगामी, सुधारणावादी विचारांचा आहे. अशा महाराष्ट्रात भोंदुगिरी आणि बुवाबाजी फोफावत असेल आणि त्यात आमचे सत्ताधारी सहभागी होत असतील तर भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खासकरून मंत्र्यांना सहआरोपी केले पाहिजे. मंत्र्यांना सहआरोपी करेपर्यंत भोंदूगिरी थांबणार नाही, अशी जोरदार मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

या प्रकरणात सहभागी असलेले काही जण पळवाट काढत आहेत. खरातवर २००३ मध्ये पहिला गुन्हा दाखल झाला. २००५ मध्येही गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकमधील एका वृत्तपत्रात खरातच्या कारनाम्यांबाबत लेखमालाही प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी पत्रकाराला धमक्या देण्यात आल्या. तरीही मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे अशोक खरातकडे जात असतील, त्याच्या पायावर डोकं ठेवत असतील, पूजा, विधी करत असतील, तंत्र-मंत्र, जादूटोणा करत असतील तर या सर्व मंत्री आणि राजकीय नेत्यांना सहआरोपी केले पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.

नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सक्षम अधिकारी आहेत. त्यामुळे जो मुख्य आरोपी पकडला आहे, त्याचा जबाब नोंदवून घेतला जातो आहे. कितीही मोठी नावे समोर आली तरीही ती दडपली जाणार नाहीत, दीपक केसरकरांवर कोणी विश्वास ठेवू नका. ते गुवाहटीला पळून गेले. ज्या नेत्यांना या गोष्टीचे छंद होते, ते सर्व आमच्यातून बाहेर गेले, असाही आरोपही राऊत यांनी केला आहे.

दीपक केसरकर यांची चौकशी करा

एकनाथ शिंदे यांना दीपक केसरकर यांनीच अशोक खरात आणि गुवाहाटीचा रस्ता दाखला. खरात यांच्याकडून विविध राजकीय नेत्यांचा आणि राजकीय घटनांचा भांडाफोड होण्याची शक्यता असल्यामुळे राजकीय नेत्यांकडून खरातला संपविण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.