मुंबई : मुंबईच्या विकासासाठी शहरात म्हाडा, एमएमआरडीए, मेट्रो, एमआयडीसी, एसआरए अशी अनेक प्राधिकरणे कार्यरत आहेत. मात्र, असे असूनही मुंबईचा सर्वांगीण विकास अद्याप झालेला नाही. संबंधित प्राधिकरणांमधील समन्वयाअभावी मुंबईची वाताहात होत असून शहराच्या विकासासाठी केवळ एकच म्हणजे मुंबई महानगरपालिका हेच प्राधिकरण असावे. जेणेकरून मुंबईचा सुनियोजित विकास साधता येईल, अशी ठरावाची सूचना शिवसेनेच्या (ठाकरे) नगरसेवकाकडून मांडण्यात येणार आहे.

मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे. गेल्या काही काळात मुंबई महानगरपालिकेसोबत राज्य सरकारच्या वतीने म्हाडा, एमएमआरडीए, मेट्रो, एमआयडीसी, एसआरए अशी अनेक प्राधिकरणे अस्तित्वात आहेत. इतर प्राधिकरणाच्या समन्वयाअभावे मुंबईची वाताहात होत आहे. प्रदूषण, वाहतूक कोंडी, वर्षानुवर्षे रखडलेली कामे आदींमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. इतर प्राधिकारणांना कोणत्याही प्रकारची जबाबदारीची आणि वेळेची मर्यादा नसल्याने वर्षानुवर्षे कामे सुरू राहतात. कोणतेही बंधन व नियोजन नाही.

गेल्या काही वर्षांपासून मुंबई बकाल होत असून मुंबईतील करदात्यांच्या पैशांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे. त्यामुळे मुंबई सुनियोजित आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी कायद्याद्वारे स्थापित झालेले आणि परिपूर्ण असलेले एकमेव मुंबई महानगरपालिका हे एकच प्राधिकरण असावे. अशी ठरावाची सूचना शिवसेनेचे (ठाकरे) नगरसेवक सचिन पडवळ महापालिका सभागृहाच्या पुढील बैठकीत मांडणार आहेत.