मुंबई : मुंबई महापालिकेच्या वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाने उमेदवार न दिल्यामुळे या निवडणुका देखील बिनविरोध होणार आहेत. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकांप्रमाणेच शिवसेना (ठाकरे) पक्षाने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली होती, मात्र आयत्या वेळी अर्ज भरलेच नाहीत. त्यामुळे एकेकाळी सत्तेत असलेल्या शिवसेना (ठाकरे) पक्षाला सत्ताधारी पक्षाच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरण्याचे धाडसही करता आले नाही.
गेली पंचवीस – तीस वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर पहिली महापालिका निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे) महायुतीला ११८ जागा मिळाल्या. तर शिवसेना (ठाकरे) पक्षाला ६५ जागा मिळाल्या. त्यामुळे गेली तब्बल पंचवीस – तीस वर्षे सत्तेत असलेला शिवसेना (ठाकरे) पक्ष यावेळी विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. मात्र विरोधी पक्षात गेल्यानंतर या पक्षाची अवस्था गोंधळल्यासारखी झाली आहे. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी पक्षाच्यावतीने उमेदवार उभे केले जाणार होते. तशी तयारी देखील केली होती.
संख्येचे गणित जुळत नसतानाही शिवसेना (ठाकरे) पक्षाने उमेदवार देण्याचे ठरवले होते. मात्र आयत्या वेळी अर्ज दाखल केलेच नाहीत. तर आता वैधानिक समित्यांसाठी बुधवारी अर्ज भरण्याच्या दिवशी देखील शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून अर्ज भरण्याची तयारी करण्यात आली होती. त्याकरीता पक्षाने चार अर्ज घेतलेही होते. मात्र आयत्या वेळी पालिकेतील शिवसेना (ठाकरे) गटाने अर्ज भरलाच नाही.
शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला जाणार याची दिवसभर पालिका वर्तुळात चर्चा होती. त्याकरीता प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सज्ज होते. मात्र अर्ज भरण्याची वेळ संध्याकाळी सहा वाजेपर्यंत होती, तोपर्यंत पक्षाने एकही अर्ज भरला नव्हता. स्थायी समितीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे २६ पैकी १४ सदस्य आहेत, तर शिवसेना (ठाकरे) यांचे सात सदस्य आहेत. विरोधकांची एकूण संख्या १२ आहे. सुधार समितीवरही अशीच स्थिती आहे. त्यामुळे शिवसेना (ठाकरे) पक्षाला जिंकण्यासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागली असती. मात्र पक्षाने लढाई लढण्याआधीच माघार घेतली आहे.

