scorecardresearch

न्यायदेवतेवरील विश्वास सार्थ ; उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन; मेळावा योग्यपणे पार पाडण्याची जबाबदारी राज्य सरकारची

न्यायदेवतेवरील विश्वास आज सार्थ ठरला तसेच मेळावा योग्यपणे पार पाडण्याची राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडेल, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.

न्यायदेवतेवरील विश्वास सार्थ ; उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन; मेळावा योग्यपणे पार पाडण्याची जबाबदारी राज्य सरकारची
उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेनेत दोन गट नाहीत, शिवसेना ही शिवसेनाच असून ती आता वाढली आहे. भगवा झेंडा हीच आपली उमेदवारी आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक महापालिका जिंकायचीच, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केले. न्यायदेवतेवरील विश्वास आज सार्थ ठरला तसेच मेळावा योग्यपणे पार पाडण्याची राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडेल, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.

दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला परवानगी दिली. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना नेते व कार्यकर्त्यांनी ठाकरे ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर आणि राज्यभरात अनेक ठिकाणी जल्लोष केला. न्यायालयाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करून ठाकरे म्हणाले, तुमचा उत्साह, प्रेम आणि एकजूट, अशीच कायम ठेवा. यावेळी कोणत्याही परिस्थितीत आपल्याला प्रत्येक महापालिकेवर शिवरायांचा भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. करोना काळ सोडला, तर दसरा मेळावा एकदाही चुकविलेला नाही. मेळाव्याला येताना शिवसेना कार्यकर्त्यांनी वाजतगाजत यावे. मात्र परंपरेला गालबोट लागणार नाही, याची काळजी घ्यावी, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

शिवसेना नेते अनिल परब म्हणाले, कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांची आहे आणि आम्ही सुद्धा त्याचे पालन करू. आम्ही २०१२ ते २०१६ या कालावधीत उच्च न्यायालयाची परवानगी घेऊन शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेत आहोत. परंतु सदा सरवणकर यांनी आमची शिवसेना हीच खरी शिवसेना अशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. हा सत्याचा विजय आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.

शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव?

पोलीस व महापालिकेने दसरा मेळाव्याबाबत न्यायालयात भूमिका मांडली होती व त्यावर न्यायालयाने निर्णय दिला आहे. प्रशासनाकडून त्याचे पालन केले जाईल,  असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार शिंदे गटाकडून सुरू असून त्याबाबत कायदेतज्ज्ञांशी विचारविनिमय करण्यात येत आहे. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असून आदेशाची प्रत आल्यावर त्यावर विचारविनिमय करून पुढील भूमिका घेतली जाईल, असे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितले.

आमच्या मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान अपुरे- दादा भुसे

डोंबिवली : दसरा मेळाव्यासाठी दादरचे शिवाजी पार्क मैदान समोरच्यांना मिळाले ते एकार्थाने बरे झाले. या मैदानाची आसनक्षमता फक्त ५० हजार आहे. डोंबिवलीतील बंदिस्त सभागृहातील दसरा मेळावा बैठकीसाठी बोलवलेल्या बैठकीला एका इमारतीमधील तीन सभागृह शिवसैनिकांनी खचाखच भरली असतील तर शिवाजी पार्क पेक्षा पाच पट अधिक आसन क्षमतेचे मैदान आम्हाला आता पहावे लागेल, अशी स्पष्टोक्ती राज्याचे बंदरे विकास मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी येथे दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या