मुंबई : आधी नाथ होते आणि आता दास झाले आहेत. शिवसेना हा निखारा आहे. पाय ठेवाल तर जळून जाल, असा इशारा मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना दिला. त्याचबरोबर हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा, असे आव्हानही ठाकरे यांनी बंडखोरांना दिले.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षसंघटना एकसंध ठेवण्याच्या दृष्टीने शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शनिवारी दुपारी बोलावण्यात आली. त्यात उद्धव ठाकरे बोलत होते. शिवसेना भवनमध्ये झालेल्या या बैठकीत सहा ठराव करण्यात आले. बंडखोरांवर कठोर कारवाई करण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना देणारा ठरावही मंजूर करण्यात आला.

आधी नाथ होते आणि आता हे दास झाले आहेत अशा शब्दांत ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला. शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट असे नाव एकनाथ शिंदे गटाने घेतल्याचे वृत्त शनिवारी सकाळी झळकले होते. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. तुमचे कर्तृत्व काय आहे. बाळासाहेबांचे नाव दुसऱ्यांना वापरता येणार नाही. हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा, असे आव्हान दिले. कायद्याचा विचार करता शिवसेना कोणी आपल्यापासून चोरू शकत नाही. त्याचबरोबर दुसरी शिवसेनाही स्थापन करू शकत नाहीत. बंडखोर आमदारांना भाजपमध्ये किंवा प्रहारमध्येच विलीन व्हावे लागेल, असा टोलाही ठाकरे यांनी लगावले.

ठाकरे यांचेच वर्चस्व : शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक २०१८ मध्ये झाली होती. शिवसेनेच्या घटनेनुसार २८२ जणांच्या प्रतिनिधी सभेने उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. तर कार्यकारिणीत १४ सदस्य आहेत. त्यापैकी ९ हे शिवसेना प्रतिनिधी सभेने निवडून दिले आहेत. तर ५ जणांची नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अधिकारात केली आहे. एकनाथ शिंदे हे असेच उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केलेले सदस्य आहेत. शिवसेनेची घटना व त्यातील ही सर्व रचना पाहता शिवसेना पक्षसंघटनेवर नियंत्रण मिळवणे म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्यासाठी जवळपास अशक्यप्राय आहे.

मंत्र्यांवर कारवाईचा बडगा

शिवसेना कार्यकारिणीतील ठरावाप्रमाणे बंडखोर आमदारांवर कारवाई करताना पहिला बडगा मंत्रीपदी असलेल्या नेत्यांवर उगारण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे, संदीपान भुमरे आदींवर प्रथम कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येते.

शिवसेना कार्यकारिणीतील ६ ठराव

शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा लौकिक वाढवल्याबद्दल राष्ट्रीय कार्यकारिणी उद्धव ठाकरे यांच्याप्रती ऋण व्यक्त करत पुढील काळातही असेच मार्गदर्शन करावे ही विनंती करत आहे. शिवसेनेच्या काही आमदारांनी अलीकडे केलेल्या गद्दारीचाही कार्यकारिणी तीव्र धिक्कार करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामागे भक्कमपणे उभी आहे. सद्यस्थितीवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी निर्णय घेण्याचे व अंमलबजावणीचे संपूर्ण अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात येत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून प्रभावी कामगिरी केल्याबद्दल आणि करोना काळातील चांगल्या कामाबद्दल व महात्मा फुले शेतकरी कर्जमाफीच्या यशाबद्दल कार्यकारिणी त्यांचे अभिनंदन करते.

आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जोमाने लढवून शिवसेनेचा भगवा सर्वत्र फडकवण्याचा निर्धार कार्यकारिणी व्यक्त करते.

मुंबई शहर व उपनगरातील मेट्रो रेल, किनारपट्टी रस्ता, ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफी आदी लोकहिताच्या निर्णयांबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे कार्यकारिणी अभिनंदन करते.

शिवसेना व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून कोणीही ते विलग करू शकत नाही. म्हणून शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नाव शिवसेना पक्षाव्यतिरिक्त कोणालाही वापरता येणार नाही.

हिंदुत्वाच्या विचाराशी शिवसेना प्रामाणिक होती व राहील. मराठी माणसाच्या अस्मितेशी शिवसेना कधी प्रतारणा करणार नाही. शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे अधिकार ही राष्ट्रीय कार्यकारिणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देत आहे.