भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना विश्वास

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार लोकशाही मार्गांनी हटवू आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला धूळ चारण्यात येईल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला.

आसाममधील आमदारांच्या मार्गदर्शन शिबिराच्या निमित्ताने नड्डा हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात पक्षाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी नड्डा यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता येईल आणि नंतर राज्यातही भाजप सत्तेवर येईल, असे स्पष्ट केले.

नड्डा यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेश स्तरावरील काही ज्येष्ठ नेत्यांशी आणि आमदार मंगलप्रभात लोढा व अतुल भातखळकर यांच्याशी आगामी निवडणुकांच्या तयारीविषयी संघटनात्मक बाबींवर चर्चा केली. त्यानंतर मुंबई भाजपच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. भाजपचे मुंबईतील खासदार-आमदार व पदाधिकारी त्यात सहभागी झाले होते. ‘भाजप येणार, मुंबई घडविणार’, असा नारा मुंबई भाजपने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिला आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या व शिवसेनेपेक्षा केवळ दोन जागा कमी मिळाल्यामुळे भाजपला महापालिकेत सत्ता मिळू शकली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत पूर्ण ताकदीने प्रयत्ना करण्याच्या सूचना नड्डा यांनी भाजप नेत्यांना दिल्या आहेत. गेल्या निवडणुकीत उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे ज्या प्रभागात तयारी कमी पडली, तेथे आता पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देऊन अधिक लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महाविकास आघाडी सरकारमुळे निर्माण झालेली राजकीय समीकरणे, काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याने प्रत्येक प्रभागातील परिस्थिती याचा आढावा घेत संघटनात्मक तयारी करण्यात येत असल्याचे वरिष्ठ नेत्याने सांगितले.