scorecardresearch

शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार- सूत्र

मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंचा महत्त्वपूर्ण निर्णय

Shiv Sena , BJP, Maharashtra , election , Mumbai, BMC, Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
Shiv Sena will contest upcoming election separately : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी गुरूवारी मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

आगामी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी गुरूवारी मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना एकट्याने लढण्याची तयारी करा, असे आदेश दिले. शिवसैनिकांनीही भाजपसोबत युती न करता स्वबळावर लढण्याचे समर्थन केले. शिवसेनेकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेचा स्वबळावर लढण्याचा निर्धार पक्का आहे. मात्र, या बैठकीत आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात कोणतेही भाष्य करण्यात आले नाही.

सत्तेत आल्यापासूनच शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या कुरबुरी गेल्या दोन-अडीच वर्षांत विकोपाला पोहचल्या आहेत. त्यामुळे विधानसभेप्रमाणेच आगामी मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर दोन्ही पक्ष विभक्त होतील, अशी अटकळ बांधण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपला हिंमत असेल तर युती तोडून दाखवा, असे आव्हानही दिले होते. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीकडे समस्त राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. आज बैठकीला सुरूवात झाल्यानंतर बहुतांश शिवसैनिकांनी आगामी काळात भाजपसोबत जाऊ नये, असेच मत उद्धव ठाकरेंसमोर व्यक्त केले. मात्र, आतापर्यंतचा भाजपचा झंझावात पाहता अद्यापही स्वबळावर लढून जिंकता येईल का, याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तामिळनाडू आणि बिहारचे उदाहरण दिल्याचे समजते. या दोन्ही राज्यांमध्ये जयललिता आणि लालूप्रसाद-नितीशकुमार यांनी भाजपला धूळ चारून स्वबळावर सत्ता मिळवली आहे. महाराष्ट्रातदेखील असाच कित्ता गिरवात येऊ शकतो, असा विश्वास कार्यकर्त्यांना देण्याचा प्रयत्न उद्धव यांनी बैठकीत केल्याचे समजते. दरम्यान, या बैठकीनंतर शिवसेनेच्या एकाही नेत्याने बैठकीतील तपशील देण्यास नकार दिला. उद्धव ठाकरेच शिवसेनेची भूमिका स्पष्ट करतील, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-10-2016 at 14:24 IST