आपल्या देशात पाकिस्तानी राष्ट्रध्वज फडकावणे, पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणे आणि भारतीय सैनिकांची शिरे धडावेगळी करून पाठविली जाणे, हे ज्यांना मान्य आहे, अशा पाकिस्तानप्रेमींनी खुशाल पाकिस्तानात चालते व्हावे, असे शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ठणकावले. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादी कारवाया थांबवत नाही, तोपर्यंत शिवसेनेचा पाकिस्तानला विरोध कायम राहील. तोपर्यंत क्रिकेट, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा अन्य कोणतेही संबंध नकोत, असे कदम यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
मुंबईसह भारतात पाकिस्तानी क्रिकेट संघाचे सामने आयोजित करण्यात यावेत आणि त्यास पोलीस संरक्षण पुरविले जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी सांगितले होते. त्याचा समाचार घेताना, दानवे यांची भूमिका ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भूमिका आहे का, मोदी यांची निवडणुकीआधीची पाकिस्तानबाबतची भाषणे काढून पाहा, असे कदम म्हणाले. शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी किंवा त्यांच्या नाकावर टिच्चून पाकिस्तानी खेळाडू किंवा कलावंतांचे कार्यक्रम आयोजित करणे वगैरे बाबींना पाठिंबा दिला जात असेल, तर हे शहीद सैनिकांच्या आणि दहशतवादी कारवायांना बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या जखमांवर मीठ चोळणे आहे, हे लक्षात ठेवावे, असा सज्जड दम कदम यांनी दिला.
शिवसेनेने राष्ट्रप्रेमातून ही भूमिका घेतली आहे. राष्ट्रप्रेम काय शिवसेनेनेच दाखवावे, इतरांनी नको का, असा सवाल करून राष्ट्रप्रेम व्यक्त केल्याने शिवसेना ही दहशतवादी संघटना होत नाही, असेही कदम म्हणाले. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या कार्यक्रमावरून शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवर टीका करताना भाजपचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशीष शेलार यांनी माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद ‘मातोश्री’ बंगल्यावर गेला होता, अशी टीका केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टिप्पणी करण्याची अॅड. शेलार यांची ‘औकात’ आहे का, असा हल्ला कदम यांनी चढवला, तर आपल्याला शिवसेनाप्रमुखांविषयी आदर असून आपण शिवसेनाप्रमुखांविषयी बोललोच नव्हतो, असे स्पष्टीकरण अॅड. शेलार यांनी केले आहे.