मुंबई : देशात केवळ भाजपच हिंदुत्ववादी पक्ष असावा दुसरा नको अशी त्याच्या नेत्यांची भूमिका आहे. त्यातूनच शिवसेना संपवण्याचे कारस्थान  रचले आहे. आपल्याच काहींनी भाजपला साथ देत पाठीत खंजीर खुपसला आहे, पण मी शिवसेना पुन्हा उभी करेन, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी व्यक्त केला. त्याआधी ठाकरे यांनी बंडखोरांना, ‘‘शिवसेना आणि ठाकरे नाव न घेता जगून दाखवा,’’ असे आव्हान दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांच्या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांचे गट आणि त्यांच्या बंडाला कथित खतपाणी घालणाऱ्या भाजपला लक्ष्य केले आणि शिवसेना पुन्हा उभी करण्याचा निश्चय व्यक्त केला. त्याआधी त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा प्रमुखांशीही संवाद साधला होता.   शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची मांडणी केल्याने त्यावेळी शिवसेनेने विधानसभा पोटनिवडणूक जिंकली होती. ती निवडणूक जिंकल्यानंतर भाजपने शिवसेनेशी युती केली आणि शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका घेतली, असा दाखला देत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘शिवसेना हा एक विचार असून तो विचार संपवणे हेच भाजपचे धोरण आहे हे समजून घ्या. शेरास सव्वाशेर भेटतोच. कदाचित त्यामुळेच भाजपला उत्तर देण्याची जबाबदारी भवानीमातेने शिवसेनेवर टाकली आहे.’’

गेलेले काही आमदार माझ्या संपर्कात आहेत. वर्षां सोडले म्हणजे मोह सोडला, पण जिद्द सोडलेली नाही. शिवसैनिकांच्या भरवशावर मी लढणार आहे. कोणी काही करो, शिवसेनेला पुन्हा विजयी केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

बंडखोरांना आव्हान

मला कोणत्याही पदाचा मोह नाही म्हणून मी ‘वर्षां’ निवासस्थान सोडले, पण याचा अर्थ लढाई सोडली असा नव्हे. शिवसेनेतील आमदारांचे बंड हा भाजपचा डाव आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे नाव घेणाऱ्यांनी ठाकरे आणि शिवसेना या नावाशिवाय जगून दाखवावे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिले. त्याचबरोबर कोणीही उरले नाही तरी शिवसेना पुन्हा उभी राहील आणि आगामी निवडणुकीत यश मिळवेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना विधिमंडळ पक्षाबरोबरच शिवसेना पक्ष संघटनेतही फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील शिवसेनेचे सर्व जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांशी ठाकरे यांनी संवाद साधला. शिवसेना भवनवर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

बाळासाहेबांच्या निधनानंतर २०१४ मध्ये शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यावर एकनाथ शिंदे यांना पक्षाने पहिल्यांदा मंत्री केले. महाविकास आघाडी सरकारमध्ये दोन महत्त्वाची खाती दिली. प्रत्येक मुख्यमंत्री नगर विकास खाते स्वत:कडे ठेवतो. मात्र मी हे महत्त्वाचे खाते एकनाथ शिंदे यांना दिले. त्यांचा मुलगा खासदार झाला. संजय राठोड यांच्यावर घाणेरडे आरोप झाले. त्या संकटात मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो. तरीही या मंडळींनी बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचे नाव घेत शिवसेना आमदारांना फोडले, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. बाळासाहेबांचे नाव घ्यायचे आणि आमदार फोडायचे या कृतीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

शिवसेना पुन्हा बहरेल

यापूर्वीही शिवसेनेवर अनेक संकटे आली. पण प्रत्येक संकटातून शिवसेना उभी राहिली. मी शिवसेना सांभाळण्यास अपात्र आहे, असे वाटत असेल तर आताही तुमच्यापैकी ज्यांना जायचे आहे त्यांनी तिकडे जावे. उज्ज्वल भविष्यासाठी निर्णय घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. माझ्याकडे आणि बाळासाहेबांच्या छायाचित्राकडे बघून भावनिक होऊन कोणीही थांबू नका. कोणीही नाही उरले तरी शिवसेना पुन्हा उभी करण्याचा माझा निर्धार आहे. ज्यांना शिवसेना पुन्हा उभी करायची आहे, त्यांनी सोबत राहावे. झाडाची पाने, फुले, फळे गळाली तरी झाडाला पुन्हा बहर येत असतो. कारण त्याची मुळे पक्की असतात. बाळासाहेबांचे शिवसैनिक ही शिवसेनेची मुळे आहेत. त्यामुळे शिवसेना पुन्हा बहरेल आणि आगामी निवडणुकांत यश मिळवेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

शिंदेंविरोधात शिवसैनिक आक्रमक

  • राज्याच्या अनेक भागांत बंडखोर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या कार्यालयांवर शिवसैनिकांनी घोषणाबाजी, निषेध मोर्चे,  फलकांना काळे.
  • मुंबईतील आमदार सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दिलीप लांडेंच्या विरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी, फलकांची फाडाफाड.
  • कोल्हापुरात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी, ठाकरे यांच्या समर्थनासाठी पदयात्रा.
  • नाशिकमध्ये शिंदे यांच्या समर्थकांनी लावलेल्या फलकांना काळे, शिंदेविरोधात आक्षेपार्ह मजकूर.
  • औरंगाबदेत आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतर्फे क्रांती चौक येथे आंदोलन.
  • जळगावात गुलाबराव पाटील यांच्याविरोधात धरणगाव येथे घोषणाबाजी, प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन.
  • धुळय़ात शिंदे यांच्या फलकांना काळे, शिवसैनिकांची घोषणाबाजी.

बंडखोरांना अपात्र ठरविण्याच्या हालचाली

बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी शिवसेनेने जोरदार हालाचाली सुरू केल्या असून विधिमंडळात शुक्रवारी त्याबाबत प्रदीर्घ बैठक झाली. या बैठकीत संबंधित आमदारांना ४८ तासांत हजर होण्याची नोटीस बजावण्याबाबत चर्चा झाली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्यासह काही प्रमुख नेत्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेतली. कायद्यातील तरतुदींची माहिती आणि सल्ला घेण्यासाठी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना विधिमंडळात बोलवण्यात आले.

शिवसेना आणि ठाकरे नाव न घेता जगून दाखवा..

मला कोणत्याही पदाचा मोह नाही म्हणून मी ‘वर्षां’ निवासस्थान सोडले, पण याचा अर्थ लढाई सोडली असा नव्हे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे नाव घेणाऱ्यांनी ठाकरे आणि शिवसेना या नावाशिवाय जगून दाखवावे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिले.

हा भाजपचा डाव

शिवसेना आमदारांना फोडल्यानंतर आता पक्ष संघटनेत फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसारच हे पाऊल उचलल्याचे सांगून पदाधिकारी-कार्यकर्त्यांची दिशाभूल केली जात आहे. हा भाजपचा डाव आहे. आपल्यात भांडणे लागावी, गैरसमज निर्माण व्हावेत यासाठीच हे आमदारांचे बंड घडवून माझ्या नावाचा गैरवापर केला जात आहे. मी कशाला बंडासाठी फूस लावू, असा सवालही ठाकरे यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena will rise again uddhav thackeray believes bjp accused conspiracy ysh
First published on: 25-06-2022 at 01:31 IST