मुंबई : मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या शिव योगा केंद्रांना मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मागील दोन वर्षांत मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांमधील ११६ शिव योगा केंद्रांत तब्बल ३१ हजार ६२३ नागरिकांनी योगविषयक प्रशिक्षण घेतले. आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून २०२४ रोजी मुंबईतील सर्व विभागांमध्ये १०० प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार इत्यादी आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी औषधोपचारांसोबतच योगासनांमुळे आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेत मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २०२२ मध्ये मुंबईतील विभाग स्तरावर शिव योगा केंद्रे सुरू केली.

हेही वाचा…मुंबईत मराठी माणसाला घर खरेदीसाठी आरक्षण हवे, पार्ल्यातील संस्थेने सर्व आमदारांना पाठवले पत्र

दोन वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेने २४ प्रशासकीय विभागांमध्ये ११६ शिव योगा केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांमध्ये प्रत्येकी एक यानुसार ११६ योग प्रशिक्षक कार्यरत आहेत. सध्या या शिव योगा केंद्रांच्या माध्यमातून ४ हजार २७८ नागरिक योग प्रशिक्षण घेत आहेत. जून २०२२ पासून ते मे २०२४ अखेरीपर्यंत ३१ हजार ६२३ नागरिकांनी या शिव योगा केंद्रांत योग प्रशिक्षण घेतले आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.

हेही वाचा…मुंबई : धरण क्षेत्रात पावसाची ओढ कायम, केवळ ५.३२ टक्के पाणीसाठा शिल्लक

यंदा आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना, “योग – स्वत:साठी आणि समाजासाठी,” ही आहे. आंतराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सर्वसामान्यांना योगविषयक माहिती व निरोगी आयुष्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी २४ प्रशासकीय विभागांत १०० प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षीही योग दिनानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या १०० सत्रांमार्फत २ हजार ५०० नागरिकांनी योग प्रशिक्षण घेतले होते.