मुंबई : शिवाजी पार्क येथील ‘चांद्रसेनीय कायस्थ प्रभु सभा’ (सीकेपी)या संस्थेच्या इमारतीचा लिलाव तूर्त स्थगित करण्यात आला आहे. एकही निविदा न आल्यामुळे लिलाव होऊ शकला नाही, असे बॅंकेने कर्ज वसुली प्राधिकरणापुढे सांगितले. प्राधिकरणानेही लिलावाला स्थगिती दिलेली नाही. मात्र लिलाव जाहीर करण्याआधी बॅंकेला सीकेपी सभेची मंजुरी घेणे आवश्यक करण्यात आले आहे.
या इमारतीच्या पुनर्विकासासासाठी घेतलेले कर्ज थकविल्याप्रकरणी दोन बँकांच्या समुहांनी या इमारतीचा लिलाव जाहीर केला होता. बँकांची साडेआठ कोटींची तर महापालिकेची तीन कोटी अशी अंदाजे साडेअकरा कोटींची थकबाकी असून त्यासाठी अर्धवट बांधकाम असलेली इमारत बँकेने लिलावासाठी काढली होती. या इमारतीची राखीव किंमत ३५ कोटी निश्चित करण्यात आली होती. परंतु कुणीही निविदा न भरल्याने हा लिलाव झालाच नाही. ठाणे भारत सहकारी बँक लि. आणि जनकल्याण सहकारी बँक यांच्या वतीने हा लिलाव १४ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला होता. कर्जापोटी थकबाकी ३१ जुलै २०२४ अखेर आठ कोटी ३१ लाख ७० हजार ७५८ रुपये इतकी आहे तर दोन कोटी २७ लाख ५३ हजार ८४३ रुपये मालमत्ता करापोटी महापालिकेने या इमारतीवर जप्ती आणली आहे. मात्र या जप्ती नोटिशीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचे या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या लिलाव नोटिशीत म्हटले होते.
बँकांच्या या नोटिशीला सभेचे सदस्य सॉलिसिटर अजित ताम्हणे, सॉलिसिटर गुंजन ताम्हणे आणि सॉलिसिटर रोहन ताम्हणे यांनी आक्षेप घेतला. हा लिलाव म्हणजे कायद्याचा गैरवापर असून तो सीकेपी सभेला बांधील नाही, असा त्यांचा युक्तीवाद आहे. धर्मादाय आयुक्तांनी २८ फेब्रुवारी २०१९ रोजी दिलेल्या आदेशात, ट्रस्टची इमारत उभारण्यासाठी १६ कोटींचे ठाणे भारत सहकारी बँकेकडून कर्ज उभारण्याबाबत परवानगी दिली. मात्र ट्रस्टची मालमत्ता गहाण ठेवण्यासाठी वा इमारतीवर गहाणखत उभारण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे बँकेने ६ जून २०१९ रोजी गेलेले गहाणखत हेच बेकायदेशीर आहे. त्यामुळे ते सीकेपी सभेला लागू होत नाही. त्यामुळे बँकेला लिलाव करण्याचा अधिकारच नाही, अशी नोटिस त्यांनी बजावली होती. याबाबत त्यांनी आता कर्ज वसुली प्राधिकरणात अंतरिम अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आता १३ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
आम्ही हे प्रकरण कर्जवसुली प्राधिकरणात नेल्यामुळे कोणीही निविदा सादर केली नसावी. आम्ही अंतरिम अर्ज केला असून आता विद्यमान कार्यकारी समिती बरखास्त करावी, यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागणार आहोत, असे अर्जदारांचे वकील ॲड. यश जुवाटकर यांनी सांगितले.
२७ ऑगस्ट २०२३ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत तळमजल्यावरील बँकेसाठी आरक्षित असलेली जागा विकण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु या प्रस्तावाला सभासदांनी विरोध केला. त्यावेळी नऊ ते दहा कोटी रुपये मिळणार होते. दुसरा कुठलाही पर्याय सभासदांनी सुचविला नाही. पर्याय सुचविण्यासाठी ज्या सभासदांनी विरोध केला त्यांची समिती नेमली. परंतु त्यांनीही काहीही सुचविले नाही. त्यामुळे आज ही लिलावाची पाळी आली आहे, असे संस्थेचे माजी अध्यक्ष अॅड. नचिकेत जयवंत यांनी स्पष्ट केले होते.
