scorecardresearch

शिवाजी पार्क आता कंत्राटदाराच्या हाती; रहिवाशांची समिती देखरेख करणार

संपूर्ण शिवाजी पार्क मैदानाच्या देखभालीसाठी पालिकेने प्रथमच कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाजी पार्कमधील धुळीचा त्रास कमी करण्यासाठी पालिकेने मैदानात हिरव्या गवताची पेरणी केली असून मैदानाचा कायापालट केला आहे.

मुंबई : संपूर्ण शिवाजी पार्क मैदानाच्या देखभालीसाठी पालिकेने प्रथमच कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाजी पार्कमधील धुळीचा त्रास कमी करण्यासाठी पालिकेने मैदानात हिरव्या गवताची पेरणी केली असून मैदानाचा कायापालट केला आहे. या बदललेल्या शिवाजी पार्कची देखभालही व्यवस्थित व्हावी याकरिता पालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयाने कंत्राटदार नेमण्याकरिता निविदा मागवल्या आहेत. स्थानिक रहिवाशांच्या समितीच्या देखरेखीखालीच ही कामे करण्यात येणार आहेत.

दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क उद्यानाच्या मैदानात विविध खेळ खेळण्यासाठी मुले येतात. विविध क्लबच्या आठ खेळपट्टय़ा या मैदानात आहेत. हे क्लब आपापल्या परिसराची देखभाल व स्वच्छता करतात. मात्र त्याव्यतिरिक्त मैदानाचा परिसर दुर्लक्षितच असतो. तसेच विविध राजकीय आणि धार्मिक सभा आणि कार्यक्रमांनंतरही या मैदानाची दुर्दशा होते. मैदान पूर्ववत करण्यासाठी अशी कोणतीही एकच संस्था आतापर्यंत नेमलेली नव्हती. तब्बल ९८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या मैदानाच्या देखभालीसाठी आता तीन वर्षांकरिता कंत्राटदार नेमण्यात येणार आहे. त्याकरिता २ कोटी ९७ लाख रुपये खर्च अपेक्षित असून पालिकेने निविदा मागवल्या आहेत.

पालिकेने या मैदानाचा कायापालट केला असून मैदानात हिरव्या गवताची पेरणी करण्यात आली आहे. तसेच ३६ कूपनलिका खोदून पाण्याचीही सोय करण्यात आली आहे. सध्या मैदानाचा पन्नास टक्के भाग गवताने हिरवागार झाला असून मे महिन्यापर्यंत संपूर्ण मैदान हिरवेगार होणार आहे. या मैदानाची देखभाल करण्याची जबाबदारी कंत्राटदार सोपवण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. माळी, पंप चालवणारे, सफाई कामगार तसेच विविध यंत्रसामुग्री असेल. दररोज गवतावर पाण्याची फवारणी करणे, वाढलेले गवत कापणे, सभा किंवा समारंभानंतर मैदान पूर्ववत करणे ही जबाबदारी या कंत्राटदारांवर सोपवण्यात येणार आहे. कंत्राटदारावर लक्ष ठेवण्यासाठी रहिवाशांची समितीही नेमण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

क्लबचे अतिक्रमण हटवले

काही क्लबनी मैदानावर अतिक्रमण केले होते. क्लबची देखरेख करण्यासाठी ठेवलेल्या व्यक्तीने झोपडे बांधून इथे संसारच थाटला होता. त्याबाबत समाजमाध्यमांवरून नागरिकांनी टीका केल्यानंतर आता हे झोपडे हटवण्यात आले असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivaji park contractor committee residents oversee ground amy