मुंबई: दिल्लीतील जंतरमंतर येथे ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या (सीजेपी) आंदोलनाचे पडसाद रविवारी मुंबईतही उमटले. दादर येथील शिवाजी पार्क परिसरात पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. आंदोलकांना पोलिस फरपटत घेऊन जात असल्याच्या चित्रफितीही समाजमाध्यमावर प्रसारित झाल्या.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत सकाळपासून आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांना शिवाजी पार्क परिसरात जाण्यापासून रोखण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

सीजेपीचे नेते अजिंक्य शिंदे यांच्या आवाहनानंतर शिवाजी पार्क टी-जंक्शन परिसरात शेकडो आंदोलक व कार्यकर्ते अचानक रस्त्यावर उतरले. दुपारी चार वाजता प्रस्तावित असलेल्या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली होती. शिवाजी पार्क परिसरात मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले होते. रस्त्यांवर अडथळे उभारण्यात आले आणि परिसरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत होती. स्थानिक रहिवाशांच्या वाहनांनाही तपासणीनंतरच प्रवेश देण्यात आला. आंदोलनासाठी जमणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत घेऊन जाण्यात आले होते. अंजली दमानिया यांना साध्या वेशातील पोलिसांनी ताब्यात घेतले. विनापरवानगी जमाव जमविणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. यावेळी पोलिसांनी शिवसेना भवन परिसरात मोठय़ा फौजफाटा तैनात करून अनेक आंदोलकांची धरपकड केली.

या कारवाईवर अमित ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी दबावाखाली काम करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही पोलिसांच्या कारवाईवर टीका केली. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंत र राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले.त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे नेत्यांनी उद्या पुन्हा शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करण्यात येणार असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

शिवाजी पार्क आणि एल. जे. रोड परिसरातील आंदोलनामुळे सायंकाळी वाहतूक मोठ्या प्रमाणावर बाधित झाली. मुंबई वाहतूक पोलिसांनी सावधगिरीने सावरकर मार्ग आणि सेनापती बापट मार्गावरील वाहने पर्यायी मार्गांकडे वळवली. दादर, माहीम आणि वरळी परिमंडळांतील संवेदनशील चौकांवर राज्य राखीव पोलीस दल आणि अतिरिक्त पोलीस तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.शनिवारीही तुषार गांधी, अभिनेता इम्रान खान आणि विविध राजकीय संघटनांतील कार्यकर्त्यांवर पोलिसांनी आता एफआयआर दाखल केलेला आहे.