ब्रिटिशकालीन वास्तुकलेचा उत्तम नमुना मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी टर्मिनसचे अंतरंग २८ डिसेंबरपासून मुंबईकरांना खुले होणार आहे. १९ व्या शतकातील या इमारतीच्या आतून फेरफटका मारण्यासाठी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना १०० रुपये तर अन्य पर्यटकांना २०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.  छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या इमारतीचा शतकोत्तर रौप्य महोत्सव २० मे २०१३ पासून सुरू होत आहे. त्या निमित्ताने आणि नव्या वर्षांची भेट म्हणून २८ डिसेंबरपासून दुपारी तीन ते पाचपर्यंत ही इमारत आतून पाहण्याची संधी देण्यात येणार आहे. सध्या केवळ दोन तास पर्यटकांसाठी ही इमारत खुली करण्यात येणार असली तरी नंतर ती कायम खुली करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे.
मुंबईच्या इतिहासाची आणि अनेक ऐतिहासिक प्रसंगांची साक्षीदार असलेली ही वास्तू ब्रिटिशकालीन गॉथिक शैलीतील वास्तुकलेचा एक अद्भुत आविष्कार आहे. ताजमहालपाठोपाठ ही वास्तू पाहण्यासाठी भारतात सर्वाधिक पर्यटक येत असल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगतात. मुंबई दर्शनासाठी येणारे पर्यटक इमारतीच्या बाहेरून या इमारतीची छायाचित्रे घेत असतात. या पर्यटकांना इमारतीचे अंतरंग दाखवावे आणि त्यांना या इमारतीच्या सौंदर्याचा याचि डोळा अनुभव घेता यावा यासाठी या इमारतीमधून फेरफटका मारण्याची संधी देण्यात येणार आहे.
उपनगरी तिकीटे मिळतात त्या स्टार चेंबरमधील अंतर्गत सजावट, ब्रिटिश काळातील रेल्वे अधिकाऱ्यांचा वावर असलेल्या खोल्या, रेल्वेचा इतिहास वस्तू आणि छायाचित्र स्वरूपात मांडलेला हेरिटेज हॉल, प्रशस्त जिना आणि त्याच्यावर असलेला घुमट आदी सर्वसामान्य प्रेक्षकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे.
या इमारतीचे सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना त्याची योग्य माहिती देण्यासाठी रेल्वेने जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून नियुक्त करायचे ठरवले आहे. या विद्यार्थ्यांंना कलेची, वास्तुशास्त्राची माहिती असल्याचा फायदा करून घेण्यात येणार आहे. पर्यटकांचा प्रत्येकी १० ते १५ जणांचा एक गट करून त्यांच्यासोबत एक मार्गदर्शक असेल. शालेय अथवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांचे ओळखपत्र दाखविल्यावरच १०० रुपये शुल्क आकारले जाईल. सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ती पर्यटकांसाठी खुली ठेवण्यात येईल.
शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त या ऐतिहासिक वास्तूचे छायाचित्र असलेले छोटे मग, पोस्टर, फोटोफ्रेम्स आदी साहित्यही विक्रीस ठेवण्यात येणार आहे.