|| निलेश अडसूळ

शिवभोजन योजनेतील मर्यादित संख्येमुळे लाभार्थीची निराशा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शिवभोजन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या दहा रुपयांतील थाळीचे एकीकडे कौतुक होत असले तरी दिवसाला १०० ताटांच्या मर्यादेमुळे अनेकांना निराशेने परतावे लागत आहे. त्यामुळे या योजनेचा तातडीने विस्तार करण्याची गरज व्य़क्त होत आहे.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यभर सुरू करण्यात आलेला शिवभोजन उपक्रम सध्या मुंबईतील लोकमान्य टिळक, के. ई. एम. आणि नायर या पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत राबवण्यात येत आहे. सध्या तीन महिन्यांसाठी हा उपक्रम सुरू राहणार आहे. मात्र, पहिल्या तीन दिवसांतच रुग्णालयाबाहेर रांगा लागू लागल्या आहेत.

वडापावच्या किमतीत मिळणाऱ्या शिवभोजनासाठी प्रत्येक जण उत्सुक असल्याने लोक वेळे आधीच येऊन उपाहारगृहाबाहेर थांबत आहेत. ही थाळी दुपारी १२ ते २ या वेळेत मिळणार असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असे सध्याचे स्वरूप आहे. परंतु थाळी संख्या मर्यादित असल्याने लोक ११.३० पासून लोक रांगा लावतात. तर दुपारी १ च्या आत सर्व भोजन उरकलेले असते. उपाहारगृह चालकांच्या मते, १०० थाळ्यांची मर्यादा असल्याने अनेक लोक निराश होऊन परत जातात.

सेवेचा लाभ गरजूंनाच मिळावा, यासाठी केईएम रुग्णालयातील उपाहारगृह चालकाने ‘पालिका, शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा नाही’ असे फलक लावले आहेत. ‘रुग्णाच्या उपचारावर बराच खर्च होत असल्याने रोज हॉटेलमध्ये जाऊन जेवणे खिशाला परवडत नाही. १० रुपयांत दिल्या जाणाऱ्या शिवभोजनाची चव आणि दर्जाही उत्तम आहे. परंतु केवळ १०० थाळ्यांच्या मर्यादेमुळे अनेकदा निराशेने परतावे लागते,’ अशी प्रतिक्रिया शीव रुग्णालयातील एकाने दिली. या थाळीचा प्रतिसाद वाढत गेला तर गर्दीमुळे रुग्णालय परिसरात गोंधळ होण्याचीही शक्यता आहे.

अ‍ॅपचा ताप

शिव भोजन देणाऱ्या उपाहारगृह चालकांना ‘शिवभोजन’ नावाचे अ‍ॅप देण्यात आले आहे. त्यामध्ये चालकांना रोजच्या जेवणात काय असणार याची यादी अ‍ॅपवर सादर करावी लागते. तसेच जेवणासाठी आलेले लाभार्थी गरजू आणि योग्य आहेत का हे पडताळण्यासाठी १०० लाभार्थींचे छायाचित्रही अ‍ॅपवर सादर करावे लागतात. उपक्रम स्तुत्य असला तरी जेवणाआधी १०० लोकांचे छायाचित्र काढून अ‍ॅपवर पाठवणे चालकोंसाठी अडचणीचे आणि वेळखाऊ ठरत आहे. शिवाय पुढे थाळ्यांची संख्या वाढल्यास सरकारला शिवभोजनाच्या सुलभीकरणासाठी ‘छायाचित्र’ प्रकार मोडीत काढावा लागेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.