राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेले आक्रमक आंदोलन पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांना संशय आहे. आंदोलनापूर्वी त्यांच्या बंगल्याची पाहणी करण्यात आल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यानुसार चार आंदोलनकर्त्यांना गावदेवी पोलिसांनी कट रचल्याप्रकरणी आझाद मैदानातून शनिवारी रात्री अटक केली. या प्रकरणामध्ये आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही शुक्रवारी अटक करण्यात आली. या प्रकरणामध्ये न्यायालयाने १०९ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. असं असतानाच आता शिवसेनेने या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीची फूस असल्याचा आरोप केलाय. गुणरत्न सदावर्ते यांना भाजपा पाठिंबा असल्याचा आरोप करत शिवसेनेनं विरोधी पक्षावर हल्लाबोल केलाय.

नक्की पाहा >> सिल्व्हर ओक आंदोलन Video: पोलीस कर्मचारी आंदोलनकर्त्या महिलेला धक्का देत असतानाच सुप्रिया सुळेंनी तिचा हात पकडला अन्…

कामगार चळवळ बदनाम झाली
“देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर झालेला हल्ला धक्कादायक आहे. स्वतःस एस.टी. कर्मचारी म्हणवून घेणारा एक गट पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानाकडे पोहोचला. त्या हिंसक आणि मद्यधुंद झुंडीने पवारांच्या घरावर हल्ला केला. महाराष्ट्राच्या राजकीय सलोख्यास, संस्कृतीस काळिमा फासणारे हे कृत्य आहे. मुंबईतील कामगार चळवळीस एक परंपरा आहे. देशाचा स्वातंत्र्य लढा व संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मुंबईतील कामगार वर्गाचे योगदान मोठे आहे. कामगार चळवळही यामुळे बदनाम झाली आहे,” असं शिवसेनेनं शरद पवारांच्या घरासमोर झालेल्या गोंधळाबद्दल भाष्य करताना म्हटलंय.

ती झुंड शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचली
“राज्यात एस.टी. कामगारांचा संप सुरू आहे. एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे ही एक मागणी सोडली तर कामगारांच्या बहुतेक मागण्या मान्य झाल्या. कामगारांना मोठा घसघशीत आर्थिक लाभ मिळाला. कामगारांचे नेते संपकऱ्यांच्यावतीने कोर्टात गेले. तेथेही चपराक मिळाली व ‘‘कामावर हजर व्हा’’ असे न्यायालयानेही बजावले. ९२ हजार एस.टी. कामगारांपैकी बहुसंख्य कामावर रुजू झाले, पण कोणीएक गुणरत्न सदावर्तेच्या चिथावणीमुळे कामगारांचा एक गट आझाद मैदानावर लढण्याच्या गर्जना करीत बसला होता. यापैकी एक ‘झुंड’ शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचली व त्यांनी दगड, चपला वगैरे फेकून हल्ला केला,” असं शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलंय.

भाजपाने त्यांच्या नव्या गुणरत्नाचे
“सदावर्ते हा माणूस अचानक उपटला व त्याला प्रसिद्धीमाध्यमांतून अकारण मोठेपण दिले गेले. सदावर्तेचा भस्मासुर निर्माण करण्यात विरोधी पक्षाचे योगदान आहे असे स्पष्ट दिसते. विरोधकांना स्वतःला ज्या लढाया लढता येत नाहीत तेथे असे ‘गुणरत्न’ ताब्यात घेऊन त्यांच्या डोक्यात झिंग भरून महाविकास आघाडीच्या विरोधात उभे केले जाते. भाजपाने त्यांच्या नव्या गुणरत्नाचे योग्य प्रकारे पालनपोषण केले व भाजपामधील नवहिंदुत्ववादी पुढारी ठाकरे-पवारांसारख्या ज्येष्ठ नेतृत्वाविषयी ज्या चिथावणीखोर भाषेचा वापर करतात, त्याच मार्गाचा अवलंब गुणरत्नाने केला,” असा टोला लगावण्यात आलाय.

वातावरण अधिकाधिक चिघळावे
“शरद पवार यांच्याबाबतीत भाजपाने दत्तक घेतलेल्या नवरत्नांनी सांगली वगैरे भागात जी भाषा वापरली, तोच कित्ता गुणरत्नाने गिरवला. म्हणजे शाळा तीच आहे. गुणरत्नाने एस.टी. कर्मचाऱ्यांसमोर अनेकदा चिथावणीची भाषणे केली व पवारांच्या घरात घुसून जाब विचारण्याचे आव्हान दिले. कामगारांचे प्रश्न सुटावेत असे सरकारला वाटत होते, पण भाजपा व त्यांच्या गुणरत्नांना तसे वाटत नसावे. वातावरण अधिकाधिक चिघळावे यासाठीच प्रयत्न केले गेले,” असा आरोप शिवसेनेनं केलाय.

तेव्हाच मुंबईतील कायद्याच्या रक्षकांनी सावध व्हायला हवे होते
“भाजपचे फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री होते. त्या काळात एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण का झाले नाही, हा विचार हिंसा करणाऱ्यांच्या डोक्यात का आला नाही? कामगार नेते म्हणून गर्जना करणाऱ्या गुणरत्नांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान आणि कामगारांचे हक्क-अधिकार याबाबत बेताल भाषणे केली. गेल्या चारेक महिन्यांपासून ज्या पद्धतीची चिथावणीखोर आणि माथेफिरू पद्धतीची भाषणे हे गुणरत्ने करीत होते, तेव्हाच मुंबईतील कायद्याच्या रक्षकांनी सावध व्हायला हवे होते,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

गुणरत्नाच्या कारवायाही शहरी नक्षलवादी चौकटीत
“शहरी नक्षलवाद समजून घ्यायचा असेल तर गुणरत्नाच्या वर्तनाकडे व भाषेकडे डोळसपणे पाहायला हवे. भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी मधल्या काळात शहरी नक्षलवादावर चिंता व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांनी शहरी नक्षलवादावर संसदेत भाषण केले आहे. शहरी नक्षलवाद हा अल कायदापेक्षा भयंकर आहे. शहरी नक्षलवाद हा उच्चशिक्षित, शहरी सुटाबुटात समाजात वावरत आहे व देश वारुळाप्रमाणे पोखरत आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणात अटकेत असलेले अनेक लेखक, विचारवंत, कवी यांच्यावर शहरी नक्षलवादी असल्याचा ठपका आहे. त्यांना फडणवीस व मोदींचे राज्य उलथवून टाकायचे होते, त्यांच्यापासून फडणवीस-मोदींच्या जीवितासही धोका होता असे आक्षेप आणि आरोप भाजपाची मंडळी सातत्याने करीत आली आहेत. सध्याच्या गुणरत्नाच्या कारवायाही त्याच शहरी नक्षलवादी चौकटीतच सुरू आहेत व त्याला खतपाणी घालण्याचे काम महाराष्ट्रातील विरोधी पक्ष करीत होता,” असा आरोप शिवसेनेनं केलाय.

भीमा-कोरेगावच्या वेळी फडणवीसांकडे गृहखाते होते
“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे, तो म्हणजे पवारांच्या घरावरील हल्ला हे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे. एस.टी. कर्मचारी आझाद मैदानातून बाहेर पडून पवारांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्या आधी ‘मीडिया’ पोहोचली तरी पोलीस यंत्रणेस खबर नसावी हे धक्कादायक आहे. फडणवीस चुकीचे बोलत नाहीत. चार महिन्यांपासून भाजपाचे गुणरत्न या विषयावर आग ओकत होते, तेव्हाच काय घडणार आहे हे पेलिसांना कळायला हवे होते. अर्थात भीमा-कोरेगावमध्ये १ जानेवारी २०१८ रोजी जी हिंसा उसळली होती आणि नंतर महाराष्ट्र पेटला होता, त्यावेळीही पोलीस यंत्रणेचे अपयश समोर आलेच होते. पोलिसांची गुप्तचर यंत्रणा तेव्हाही कोलमडली होती. मुख्य म्हणजे त्यावेळी गृहखाते तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे होते. तेव्हा त्याच पोलीस यंत्रणेबाबत आज फडणवीसांनी विचारलेले प्रश्न नोंद घेण्यासारखेच आहेत,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

महाराष्ट्र गुणांचा पूजक आहे, माथेफिरु गुणरत्नांचा नाही…
“विरोधी पक्षाने महाविकास आघाडीशी राजकीय विचाराने संघर्ष करायला हरकत नाही. तो विरोधकांचा हक्क आहेच, पण माथेफिरू गुणरत्नांना मांडीवर घेऊन आग लावणारे महाराष्ट्राचे व मराठी परंपरेचे नुकसान करीत आहेत. महाराष्ट्रात तरी नेत्यांवर असे हल्ले करण्याची परंपरा नाही. दिल्लीत शरद पवारांवर एका माथेफिरूने हल्ला करताच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. अण्णा हजारे वगळता सगळ्या महाराष्ट्राने तेव्हा हल्ल्याचा निषेध केला. हल्ल्याचे समर्थन करणारे अण्णा हजारे आज विस्मृतीत गेले. भाजपाच्या गुणरत्नांचे समर्थन करणाऱ्यांनी हे विसरू नये. माकडांची माणसं झाली यास उक्रांती म्हणतात, पण काही माकडं ही माकडेच राहिली. त्या माकडांच्या हातात विरोधी पक्षाने कोलीत देऊ नये. महाराष्ट्र गुणांचा पूजक आहे, माथेफिरू गुणरत्नांचा नाही,” असा टोला शिवसेनेनं सदावर्ते यांना लगावलाय.