scorecardresearch

पं. शिवकुमार शर्मा अनंतात विलीन

जगविख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या पार्थिवावर विर्लेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी पं. शिवकुमार शर्मा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

मुंबई : जगविख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या पार्थिवावर विर्लेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पं. शर्मा यांच्या दोन्ही मुलांनी मुखाग्नी दिला. या वेळी बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, तबलावादक झाकीर हुसेन यांच्यासह संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

पं. शर्मा यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांचा मुलगा राहुल शर्मा यांच्या जुहू येथील निवासस्थानी बुधवारी सकाळी १० ते २ या वेळेत त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री जया बच्चन, ज्येष्ठ तबलावादक झाकीर हुसेन, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, तौफिक कुरेशी, गायक हरिहरन, रूपकुमार राठोड यांच्यासह संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अंतिम दर्शन घेतले. पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दुपारी २ वाजता पवनहंस स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पं. शिवकुमार शर्मा यांनी जम्मू काश्मीरमधील लोकसंगीतातील संतूर या वाद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली. भारतीय संगीत क्षेत्रातील मानिबदू ठरलेल्या पं. शिवकुमार शर्मा यांनी शास्त्रीय संगीताच्या मैफलीत संतूर वाद्य सादर करत सतार आणि सरोदच्या जोडीला संतूर वाद्य नेऊन ठेवले. अशा या महान कलाकाराच्या जाण्याने संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

पंडितजी माझे गुरू होतेच, पण ते मला वडिलांप्रमाणे होते. त्यामुळे आज मी आपण अनाथ झालोय, अशीच भावना मनात आहे. माझे आणि पंडितजींचे नेहमी बोलणे व्हायचे. माझ्या कामाचे ते नेहमी कौतुक करायचे.  मी कोणतेही नवीन काही काम केले की त्यांना दाखवायचो, त्यांना सांगायचो. त्यावर ते माझे खूप कौतुक करायचे. आता असे माझे कौतुक होणार नाही याची खंत मनात आहे.

– तौफिक कुरेशी

मी १२ वर्षांचा होतो तेव्हापासून मी पंडितजींच्या सान्निध्यात आहे. पंडितजी मला शाळेतून कार्यक्रमाला घेऊन जात होते. ते माझे मार्गदर्शक होते, माझे गुरू होते. त्यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा मी अमेरिकेत होतो. कालच मी अमेरिकेतून निघालो होतो म्हणून आज मी त्यांचे शेवटचे दर्शन घेऊ शकलो. आज पंडितजी गेले असले तरी ते आपल्या सर्वाच्या मनात आणि कानात कायम राहणार आहेत.

– झाकीर हुसेन 

कोणताही कलाकार एखादे वाद्य वाजवतो, त्या वाद्याला आपल्या कलेच्या माध्यमातून एका मोठय़ा उंचीवर नेतो तेव्हा तो कलाकार उस्ताद होतो, त्यांचे नावलौकिक होते, त्यांना सन्मान मिळतो; पण आमच्या शिवजींबाबत उलट आहे. त्यांनी संतूरसारखे वाद्य वाजविले आणि संतूरला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवत संतूर या वाद्याला उस्ताद बनविले. या वाद्याला नावलौकिक मिळवून दिले. संतूरला शास्त्रीय वाद्य म्हणून ओळख निर्माण करून दिली. संतूरचा उल्लेख यापुढे जेव्हा जेव्हा होईल, अगदी २००-५०० वर्षांनंतरही, तेव्हा एकच नाव त्यासोबत असेल ते म्हणजे पंडित शिवकुमार शर्मा. या महान कलाकाराचे जाणे अत्यंत वेदनादायी आहे.

– जावेद अख्तर

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivkumar sharma music famous percussionist sivakumar sharma funeral ysh

ताज्या बातम्या