शिवसेना आणि भाजपमध्ये सोशल मिडीयावर सुरू असलेले पोस्टर वॉर दिवसेंदिवस शिगेला पोहचताना दिसत आहे. या दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून आज या नाटकाचा नवा अंक पाहायला मिळाला. देश पिताश्रींच्या पुण्याईवर चालत नाही, अशी टीका करत भाजपने शुक्रवारी सेनेला कडवे उत्तर दिले होते. त्यामुळे चवताळलेल्या शिवसैनिकांनी शनिवारी व्हॉटसअॅपच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. व्हॉटसअॅपवर फिरत असलेल्या या पोस्टरवर मोदींना ‘चुरणबाबा’ आणि ‘आयत्या बिळात नागोबा’ असे संबोधण्यात आले आहे.
भाजपच्या पोस्टर्संना शिवसैनिकांचे प्रत्युत्तर
‘ आयत्या बिळात नागोबा.. शिवसेनेच्या जोरावर आजवर पसरलात! गद्दार .. आमचे उपकार विसरलात!!’ अशा कठोर शब्दांत शिवसेनेने भाजपवर हल्ला चढवला आहे. तसेच ‘ अच्छे दिन, बिच्छे दिन काही नाही, लोकंच उत्तर देतील ह्यांना आम्हाला काही घाई नाही, तसंच विदेशात खूप झालं, जरा देशात बघा, मातोश्रीचे उपकार इतक्या लवकर विसरणारी हीच का ती नमोची भाजप? ‘ असा सवाल विचारणारी पोस्टर्सही व्हायरल झाली असून त्याखाली ‘शिवसेना कडकच’ असेदेखील लिहण्यात आले आहे.
देश पिताश्रींच्या पुण्याईवर चालत नाही; भाजपची सोशल मीडियामधून शिवसेनेवर टीका



